भारताचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशात गेलेल्या पर्यटकांना मागील ४८ तासांत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. पश्चिम हिमालयात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मनाली परिसरात २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या स्थितीमुळे हजारो पर्यटकांना रात्रभर वाहनांमध्येच अडकून राहावे लागले.
मनालीत पर्यटकांची गर्दी, वाहतूक यंत्रणेवर ताण
मनाली परिसरात नुकत्याच झालेल्या हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची संख्या अचानक वाढली. जवळजवळ तीन महिन्यांच्या दुष्काळानंतर झालेल्या या बर्फवृष्टीने पर्यटकांना आकर्षित केले, मात्र त्याच वेळी वाहतूक आणि प्रशासनासाठी मोठे आव्हान निर्माण झाले. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळपासून मनालीकडे जाणारी वाहतूक वाढली आणि शनिवार व रविवारपर्यंत ती महाप्रचंड वाहतूक कोंडीत रूपांतरित झाली.
२४ तासांहून अधिक काळ वाहनांत अडकले पर्यटक
कोठी ते मनाली दरम्यानच्या १५ ते २० किलोमीटरच्या मार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. २४ तासांहून अधिक काळ हजारो पर्यटक आपल्या वाहनांमध्ये अडकून पडले असून, कडाक्याची थंडी, इंधनाची टंचाई तसेच अन्न व पाण्याच्या कमतरतेमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
हॉटेल्स हाऊसफुल, पर्यटकांची गैरसोय
मनालीमधील जवळपास सर्व हॉटेल्स पूर्णपणे भरलेली आहेत. पूर्व बुकिंग नसलेल्या पर्यटकांना कुल्लूच्या खालच्या भागात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अनेक ठिकाणी काळ्या बर्फामुळे रस्ते निसरडे झाले असून, वाहनचालकांसाठी प्रवास अत्यंत धोकादायक ठरत आहे.
राज्यभर ६८५ रस्ते बंद
बर्फवृष्टीचा परिणाम केवळ मनालीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण हिमाचल प्रदेशात जाणवला. राज्यभरात एकूण ६८५ रस्ते बंद झाले असून,
लाहौल-स्पिती जिल्ह्यात सर्वाधिक २९२ रस्ते बंद आहेत, याव्यतिरिक्त, चंबा येथे 132, मंडी येथे 126 आणि कुल्लू येथे 79 रस्ते बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या परिस्थितीमुळे आपत्कालीन सेवा आणि रसद पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे.
पुढील दिवसांतही धोका कायम
हवामान खात्याच्या माहितीनुसार, २६ ते २८ जानेवारीदरम्यान पश्चिमी विक्षोभ सक्रिय राहणार असून, उंच भागात मुसळधार ते अति जोरदार बर्फवृष्टी आणि खालच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे पिवळा आणि नारिंगी अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने पर्यटकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, तसेच हवामान आणि वाहतूक अपडेट्सवर सतत लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

