(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील मापारी मोहल्ला येथील सुप्रसिद्ध हजरत हुसेन शाह पीर बाबांच्या दर्ग्यात वार्षिक उर्स महोत्सव दि. ४ व ५ फेब्रुवारी रोजी अत्यंत भक्तीभाव, उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. हा उर्स केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित न राहता हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि आपुलकीचे प्रभावी प्रतीक ठरला.
हजरत हुसेन शाह पीर बाबा हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जातात. त्यांच्या दर्ग्यात नवस फेडले जातात आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. यंदाही रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील विविध भागांतून हजारो भाविकांनी दर्ग्यात हजेरी लावून पीर बाबांचे दर्शन घेतले आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
उर्स महोत्सवाची सुरुवात ४ फेब्रुवारी रोजी रात्री धार्मिक विधी आणि पारंपरिक पद्धतीने झाली. बशीर अब्दुल करीम मापारी यांच्या निवासस्थानापासून संदल (चंदन) मुबारकाची मिरवणूक मोठ्या भक्तीभावात काढण्यात आली. मापारी मुस्लिम मोहल्ला, पारेख पेट्रोल पंप मार्गे निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत धार्मिक घोषणांनी परिसर भक्तिमय केला. दर्ग्यात पोहोचल्यानंतर मजार शरीफवर विधीपूर्वक संदल अर्पण करण्यात आला. यावेळी अनेक हिंदू बांधवांनीही श्रद्धेने दर्शन घेत दुआ मागितली.
उर्सचा मुख्य दिवस ५ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री ठीक १० वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कव्वाल साईम अली नियाझी यांच्या कव्वालीच्या जंगी मुकाबल्याने कार्यक्रमाला रंगत आली. पीर बाबांच्या शानमध्ये सादर करण्यात आलेल्या भक्तिरसपूर्ण कव्वाल्यांनी दर्गा परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारावून टाकला. कव्वालीदरम्यान भाविक मंत्रमुग्ध झाले होते आणि टाळ्यांच्या गजरात कलाकारांना भरभरून दाद दिली.
या दोन दिवसीय उर्स उत्सवात दर्गा परिसर भाविकांनी फुलून गेला होता. हिंदू-मुस्लिम बांधव खांद्याला खांदा लावून मजार शरीफवर चादर आणि फुले अर्पण करताना दिसून आले. श्रद्धा, सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा उर्स संगमेश्वरसाठी प्रेरणादायी ठरला.
उर्स काळात भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. उर्स यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उर्स कमिटीचे अध्यक्ष श्री. सज्जाद बशीर मापारी आणि समस्त उर्स कमिटी सदस्यांनी भाविक, स्थानिक नागरिक तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले

