(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याच्या अखत्यारितील उपकेंद्रांतील कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस उघड होत असून, कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे गावोगावी आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की, कर्मचारी डोअर-टू-डोअर भेटी देत नाहीत, फिरती सेवा करत नाहीत, त्यामुळे वाडीवस्त्यांतील जनता आरोग्य उपचार व जनजागृतीपासून वंचित राहते. परिणामी, जनतेतून कडक चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.
शासनाकडून आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात असतानाही, कर्मचारी मात्र आरोग्य केंद्रात किंवा घरी बसून ‘कागदी घोडे रंगवण्यात’ दंग आहेत, अशी जोरदार टीका होत आहे. फिरती तपासणी नसल्याने लसीकरणात अडथळे, आजारांच्या साथी वाढणे, कुटुंब कल्याण व राष्ट्रीय आरोग्य मोहिमांवर विपरीत परिणाम होत आहेत.
गावोगावी दरवाजांवर तारीख व स्वाक्षरी करून भेटीची नोंद करणे असा कर्मचाऱ्यांसाठी नियम आहे. मात्र, पूर्वी दिसणारे दरवाज्यांवरील रकाने आता गायब झाले आहेत. त्यामुळे जनतेने थेट “डोअर-टू-डोअर भेट नोंद दाखवा आणि बक्षीस मिळवा” अशा पैजा रंगवण्यास सुरुवात केली आहे.
या संदर्भात गावकऱ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, प्रसारमाध्यमांतूनही वृत्त दिले गेले. तरीही “मनुष्यबळ कमी आहे” हेच कायम उत्तर मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार अधिकच फोफावत आहे. त्यामुळे तालुका व जिल्हा आरोग्य विभाग निद्रिस्त अवस्थेत आहे का? कामकाजावर कुणाचेही नियंत्रण नाही का? असा सवाल जनतेतून केला जात आहे.

