(चिपळूण / प्रतिनिधी)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण (ता. चिपळूण) यांच्या वतीने दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आहेत
या संमेलनासाठी महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वैचारिक चर्चांचा आणि साहित्यिक अभिव्यक्तीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालिका तसेच साहित्य संमेलन स्मरणिकेच्या संपादिका सौ. अंजलीताई चोरगे यांनी केले आहे.
ग्रामीण जीवन, शेती, सहकार चळवळ आणि सामाजिक वास्तव यांवर आधारित विचारमंथन, संवाद आणि साहित्यिक सादरीकरणांचे हे संमेलन वैचारिक समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण, कृषी व सहकार साहित्याची परंपरा महाराष्ट्राला संत साहित्यापासून आधुनिक ग्रामीण कादंबरी, कविता, कथा, ओव्या, पोवाडे, कोळीगीते व शेतकरीगीतांपर्यंत समृद्ध लाभली आहे. कृषी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून सहकार चळवळीने शेतकरी व सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्य एकत्रितपणे मांडणारे हे संमेलन राज्यात प्रथमच आयोजित केले जात असून ही एक अभिनव संकल्पना ठरणार आहे.
ग्रामीण जीवन, शेती, सहकार आणि मराठी साहित्याचा जागर करणारे हे संमेलन साहित्यिक, शेतकरी, विद्यार्थी व रसिकांसाठी पर्वणी ठरणार असून या ऐतिहासिक साहित्यिक महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

