(रत्नागिरी)
हातीस येथे सुरू असलेल्या ऊरुसानिमित्त फिरत्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या पुणे येथील वृद्ध कामगाराचा मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेमुळे ऊरुस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विजय रामभाऊ लाड (वय 70, रा. संगमनगर, भोकड सांगवी, पुणे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी हॉटेल मालक बाळू दादा भोसले (रा. विरंगानगर लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
बाळू भोसले यांचा फिरत्या हॉटेलचा व्यवसाय असून, विजय लाड हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम करत होते. सन 2025 मध्येही पंढरपूरहून हातीस ऊरुसासाठी हॉटेल लावण्यात आले होते आणि त्यावेळीही विजय लाड भोसले यांच्यासोबत होते. यंदा 2026 मध्ये ऊरुसानिमित्त भोसले हे ‘सुनील कॉर्नर’ नावाचे हॉटेल घेऊन हातीस येथे आले होते.
सोमवार, 2 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास विजय लाड यांच्या छातीच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना जवळच्या रावटीत आराम करण्यास सांगण्यात आले. मध्यरात्री सर्व कामकाज आटोपल्यानंतर सर्वजण झोपले. पहाटे साडेतीनच्या सुमारास ऊरुस परिसरातील गर्दीचा आवाज ऐकून भोसले उठले असता विजय लाड हे खुर्चीवर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.40 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

