(रत्नागिरी)
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेतील अंतिम मूल्यमापनात ‘विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र’ यांचे कार्यालय संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांकावर ठरले आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) मूल्यांकनानुसार कार्यालयीन कार्यप्रणाली, तंत्रज्ञानाचा वापर, नागरिक केंद्रित सेवा, सुलभता आणि नवोपक्रमांमध्ये कोंकण परिक्षेत्राने सर्वोच्च कामगिरी बजावली आहे.
सुलभ संकेतस्थळ आणि माहिती साक्षरता
कोंकण पोलीस परिक्षेत्राने नागरिकांसाठी सुलभ संकेतस्थळ www.konkanrange.mahapolice.gov.in तयार केले आहे. या संकेतस्थळावर परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्यांच्या संपर्कांची सविस्तर माहिती, महत्वाच्या शासकीय लिंक्स व माहिती अधिकार संबंधित माहीती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘सुलभ जीवनमान’ विभागात, अर्ज व्यवस्थापनासाठी Application Tracking and Management System तयार करण्यात आले. तसेच हरविलेल्या मोबाईल शोध मोहीमेद्वारे CEIR पोर्टलच्या साहाय्याने ६,४४८ हरविलेले मोबाईल्सपैकी ३,३०८ शोधण्यात यश आले असून, १,०३८ मोबाईल प्रत्यक्ष हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलीसांना सौजन्य व आरोग्यदृष्टिकोनातून प्रशिक्षण
सामान्य नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तनासाठी पोलीसांना सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण देण्यात आले, जेणेकरून पोलिसांची सकारात्मक प्रतिमा समाजात निर्माण होईल. याशिवाय, पोलीसांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहारतज्ञ सायली भोसले (Indian Nutrition Coach) यांच्या मार्गदर्शनाखाली आहार आणि व्यायाम कार्यक्रम राबविण्यात आला. अवघ्या ३० दिवसांत वजन, मधुमेह, आणि रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
सुविधायुक्त कार्यालय आणि खुली भेट वेळ
कार्यालयात स्वच्छता, सुशोभीकरण, अभ्यागतांसाठी बसण्याची व पाण्याची सोय, तसेच शौचालयांचे नुतनीकरण करण्यात आले. नागरिकांनी अडचणी दूरवरून मांडता याव्यात यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा सुरू करण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट वेळ सकाळी ११ ते दुपारी २ अशी निश्चित करण्यात आली असून, त्यासंबंधी फलकही कार्यालयात लावण्यात आला आहे.
राज्य पातळीवर गौरव
वरील सर्व बाबींचा विचार करून, भारतीय गुणवत्ता परिषदेने (QCI) १०० दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या मूल्यमापनात कोंकण परिक्षेत्रास सर्वोच्च स्थान बहाल केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे कोंकण परिक्षेत्र हे राज्यातील इतर परिक्षेत्रांसाठी एक आदर्श ठरले आहे.
जनतेसाठी डिजिटल संवादाचे आवाहन
नागरिकांनी कोंकण परिक्षेत्राच्या संकेतस्थळास तसेच फेसबुक (@IGP Konkan Range), एक्स (Twitter – @IGPKonkanRange), आणि इंस्टाग्राम (@IGP Konkan Range) या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर भेट देऊन अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.