(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा भोकेच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचनमालेतील पाचवे पुष्प भोके येथील बुद्धविहारात उत्साहपूर्ण वातावरणात गुंफण्यात आले. ग्रामशाखाध्यक्ष संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, उपासक-उपासिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामशाखाध्यक्ष संजय सावंत, जिल्हा संस्कार विभागाचे उपाध्यक्ष व प्रवचनकार विजय जाधव, जिल्हा कार्यालयीन सचिव विजय कांबळे, जिल्हा संघटक तानाजी कांबळे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुनील पवार यांच्यासह जिल्हा व तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप व अगरबत्ती प्रज्वलित केली. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. ग्रामशाखेच्या वतीने प्रवचनकार विजय जाधव यांच्यासह उपस्थित जिल्हा व तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच तालुका शाखेच्या वतीने ग्रामशाखाध्यक्ष संजय सावंत, उपाध्यक्ष नरेश सावंत, सचिव प्रणित सावंत, पोलीस पाटील सचिन सावंत, महिला मंडळ अध्यक्षा नम्रता सावंत, सचिव स्वप्नाली सावंत, मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष अभिजित जाधव आणि सचिव रोशन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी वर्षावासाचे महत्त्व विशद करताना या काळात कुशल कर्म करण्याने दुःख कमी करण्याचा मार्ग सुकर होतो, असे सांगितले. त्यांनी उपस्थितांना वर्षावासाच्या शुभेच्छा दिल्या.
‘तथागतांचा प्रतीत्यसमुत्पाद-कार्यकारणभाव सिद्धांत’ हा आजच्या प्रवचनाचा विषय होता. जिल्हा संस्कार विभागाचे उपाध्यक्ष तथा प्रवचनकार आयु. विजय जाधव यांनी दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणांच्या माध्यमातून प्रतीत्यसमुत्पादातील १२ कड्यांचा सुलभ भाषेत ऊहापोह केला. मानवी जीवनातील जन्मापासून वार्धक्यापर्यंतच्या अवस्थांवर या कार्यकारणभावाचा कसा परिणाम होतो, याचे त्यांनी सखोल विवेचन केले. प्रत्येक कृतीमागे कारण असते आणि त्या कारणातून परिणामाची निर्मिती होते, हा कार्यकारणभाव व्यवहारातील उदाहरणांनी त्यांनी स्पष्ट केला. तथागतांनी सांगितलेली चार आर्यसत्ये समजून घेत दुःखाच्या निराकरणासाठी आर्य अष्टांगिक मार्ग व दशपारमितांचे आचरण आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. लोभ, हाव, आकस, आसक्ती आणि अज्ञान यांमधून दुःखाची निर्मिती होते. त्यामुळे कुशल कर्म, मैत्रीभाव आणि सदाचरणाचा अंगीकार केल्यास दुःख कमी करण्याचा मार्ग खुला होतो, असा संदेश त्यांनी दिला. तथागतांचे ज्ञान व उपदेश आत्मसात करून प्रत्येकाने स्वतःच्या प्रगतीबरोबरच समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा पाली भाषा विभागाचे उपाध्यक्ष तथा तालुका शाखेचे संघटक दिलीप वासनिक यांनी बुद्धधम्माचे साहित्य आणि संस्कार अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी धम्मलिपी व पाली भाषा शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले. तरुणांनी मोठ्या संख्येने प्रशिक्षण वर्गात प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा कार्यालयीन सचिव विजय कांबळे यांनी केंद्राने ग्रामशाखांसाठी निश्चित केलेले निकष पूर्ण करून भोके ग्रामशाखेने आदर्श ग्रामशाखेचा पुरस्कार मिळवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुका संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केंद्राच्या ‘प्रत्येक घरातून एक सैनिक’ या धोरणाचा उल्लेख करत अधिकाधिक तरुण-तरुणींनी समता सैनिक दलाचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ग्रामशाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तालुका शाखेच्या वतीने पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी प्राप्त श्रेयस भरत सावंत, सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी प्राप्त कु. ऋतुजा भरत सावंत व कु. श्रद्धा बबन सावंत यांचा समावेश होता. तसेच दहावीमध्ये उल्लेखनीय यश मिळविणारे कु. आयुष्य बबन सावंत, कु. पार्थ अभय सावंत, कु. अवंती अविनाश जाधव, कु. सुहानी सचिन सावंत, कु. श्रावणी किशोर सावंत, बारावीमध्ये यश संपादन करणारे कु. सुजल दीपक जाधव आणि दहावीमध्ये यश मिळविणारे कु. हर्ष दीपक जाधव यांचाही गौरव करण्यात आला. ग्रामशाखेतील अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. ग्रामशाखाध्यक्ष संजय सावंत यांनी भगवान बुद्धांचा उपदेश आणि संस्कार जपल्यानेच समाजाची सर्वांगीण प्रगती साध्य होईल, असे सांगत प्रवचनकार, जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी तसेच उपस्थित उपासक-उपासिकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामशाखेच्या वतीने आयु. संदीप सावंत गुरुजी आणि तालुका शाखेच्या वतीने आयु. राजेंद्र कांबळे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा शाखेचे चार, तालुका शाखेचे ११ आणि ग्रामशाखेचे सुमारे ९५ ते १०० सभासद असे एकूण ११० ते ११५ उपासक-उपासिका उपस्थित होते. शरणगमनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर ग्रामशाखेच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनदान करण्यात आले.

