(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण ३२ जागांपैकी तब्बल २९ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून, आघाडीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालातून मतदारांनी अनुभवासोबतच नव्या नेतृत्वालाही संधी दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत १५ माजी नगरसेवकांना पुन्हा सभागृहात काम करण्याची संधी मिळाली असली, तरी १० माजी नगरसेवकांना मतदारांनी नाकारले आहे. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल १७ नवे चेहरे नगरपरिषदेत दाखल झाले असून, नव्या आणि जुन्या चेहऱ्यांचे संतुलित मिश्रण सभागृहाला मिळाले आहे. आघाडीकडून केवळ तीन उमेदवार निवडून आले असून, हे तिघेही नवखे आहेत. त्यामध्ये फौजिया तनवीर मुजावर, केतन उमेश शेट्ये आणि अमित विलणकर यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेल्या सहाही उमेदवारांनी विजय मिळवत पक्षाची शतप्रतिशत यशस्वी कामगिरी नोंदवली आहे. यामध्ये चार माजी नगरसेवकांसह नितीन जाधव आणि वर्षा ढेकणे हे दोन नवे चेहरे आहेत.
शिंदेसेनेने यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांवर भर दिल्याचे दिसून आले. पक्षाचे १२ नवे उमेदवार विजयी झाले असून, त्यामध्ये सौरभ मलुष्टे, पूजा पवार, राजीव कीर, मेधा कुलकर्णी, गणेश भारती, नाहिदा सोलकर, विजय खेडेकर, सायली पाटील, जागृती पिलणकर, आफ्रीन होडेकर, निवेदिता कळंबटे आणि रुखसार खान यांचा समावेश आहे. दरम्यान, महायुतीच्या १५ माजी नगरसेवकांना मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये शिंदेसेनेचे ११ आणि भाजपचे चार नगरसेवक आहेत. वैभवी खेडेकर, स्मितल पावसकर, निमेश नायर, प्रीती सुर्वे, राजन शेट्ये, श्रद्धा हळदणकर, दत्तात्रय ऊर्फ बाळू साळवी, मानसी करमरकर, राजेश तोडणकर, समीर तिवरेकर, सुप्रिया रसाळ, राकेश नागवेकर, सुहेल साखकरकर, संतोष कीर आणि सुहेल मुकादम यांचा त्यात समावेश आहे.
मात्र, या निवडणुकीत काही अनुभवी माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. सलील डाफळे, उज्ज्वला शेट्ये, रशिदा गोदड, अस्मिता चवंडे, सुशांत चवंडे, भास्कर आंबेकर, नाझनीन हकीम, सईद पावसकर आणि राजश्री शिवलकर यांना मतदारांनी नाकारले. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी नवख्या उमेदवारांनी अनुभवी मंडळींना पराभव स्वीकारायला भाग पाडले. एकूणच, रत्नागिरी नगरपरिषदेच्या निकालातून महायुतीचे वर्चस्व अधोरेखित होत असतानाच, बदलाची अपेक्षा आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याची मतदारांची मानसिकताही स्पष्टपणे समोर आली आहे.

