(रत्नागिरी)
रत्नागिरी–पावस मार्गावरील फणसोप हायस्कूलच्या मागील बायपास रस्त्यावर रविवारी (१ फेब्रुवारी) रात्री झालेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या अपघातात जयप्रकाश चंद्रिका यादव (वय ५३) आणि ओमप्रकाश चंद्रिका यादव (वय ५१, दोघेही मूळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश; सध्या रा. फणसोप सडा, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. तर संभाजी बंकट हुलगे (वय २१, मूळ रा. लातूर; सध्या रा. फणसोप सडा, रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जयप्रकाश यादव हे एमएच ०८ बीजे ३८५६ क्रमांकाच्या दुचाकीवरून पाठीमागे त्यांचा सख्खा भाऊ ओमप्रकाश यादव आणि संभाजी हुलगे यांना ट्रीपलसीट बसवून पावसहून रत्नागिरीकडे येत होते. फणसोप हायस्कूलच्या मागील बायपास रस्त्यावर अचानकपणे दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.
अपघातात रस्त्याच्या बाजूला असलेले चिरे-दगड डोक्याला जोरात लागल्याने जयप्रकाश आणि ओमप्रकाश यादव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संभाजी हुलगे यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी जखमी संभाजी हुलगे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीस्वार जयप्रकाश चंद्रिका यादव याच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. या अपघातामुळे फणसोप परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दुचाकीवर ट्रीपलसीट आणि भरधाव वेग यामुळे वाढणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

