(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक (आय.एस.ओ. मानांकन प्राप्त) आदर्श शाळा भोके आंबेकरवाडी (ता. जि. रत्नागिरी) चे मुख्याध्यापक श्री. प्रदीप शांताराम जाधव यांना सन २०२५-२६ या वर्षीचा रत्नागिरी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत जाधव यांनी शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध, नासा-इस्रो परीक्षा आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा व तालुका स्तरावर यश मिळवून दिले आहे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही अनेक विद्यार्थी जिल्हास्तरावर चमकले आहेत. शाळेला आय.एस.ओ. मानांकन, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यात दुसरा क्रमांक, आदर्श शाळा व आदर्श परसबाग अशी मानांकने मिळवून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नवे मापदंड निर्माण केले आहेत.
यापूर्वी प्रदीप जाधव यांना राज्यस्तरीय साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. समाजकार्य, शैक्षणिक उपक्रम व तंत्रस्नेही अध्यापन यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक झाले आहे. शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण रुजवण्याचे आणि सामाजिक कार्यातून समाजजीवन समृद्ध करण्याचे त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. शब्दगंध समूह प्रकाशनानेही त्यांच्या कार्याची दखल घेत विशेष सन्मान जाहीर केला आहे. “आपले शैक्षणिक व सामाजिक योगदान स्तुत्य असून, समाजात सकारात्मक बदल घडविणारे आहे, असे कौतुकपर शब्द अभिनंदनपत्रात नमूद करण्यात आले आहेत.
प्रदीप जाधव यांच्या या यशामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्राला नवे प्रेरणास्थान लाभले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील विविध घटकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

