(तरवळ / अमित जाधव)
“माती कसदार असेल तर कोणतेही बी रुजते. तसेच उत्सुकता आणि कुतूहल असेल तर माणूस घडतो. मुळाक्षरे शिकणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर अक्षरांची मुळे थेट जीवनाशी जोडणे म्हणजे खरे शिक्षण,” असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार व प्रसिद्ध व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज येथे आयोजित ‘जो गतीत तो प्रगतीत’ या प्रेरणादायी व्याख्यानपर कार्यक्रमात ते बोलत होते. गणपतीपुळे येथे दर्शनासाठी आले असताना त्यांनी मालगुंड प्रशाला व ज्युनियर कॉलेजला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मालगुंड ही आधुनिक मराठी कवितेचे जनक क्रांतिकारी कवी केशवसुत यांची जन्मभूमी असून आधुनिक कवितेची राजधानी आणि साहित्याचे तीर्थक्षेत्र म्हणून तिची ओळख आहे. “कुसुमाग्रजांनी ज्या भूमीचा उल्लेख मराठी कवितेची राजधानी म्हणून केला, त्या पावन भूमीत येण्याचे भाग्य मला लाभले,” असे भावनिक उद्गार प्रा. दवणे यांनी काढले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, प्रगती ही गतीशिवाय शक्य नाही. ज्ञानार्जन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. शिकताना तहान आणि उत्सुकता हवी, अन्यथा आयुष्य रुक्ष बनते. स्पर्धा म्हणजे दुसऱ्याला हरवणे नव्हे, तर स्वतःला कालपेक्षा दोन पावले पुढे नेणे होय. नियमित वाचन करा, ‘मी कोण आहे’ हा प्रश्न स्वतःला सतत विचारा.
मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत सावध करताना ते म्हणाले की, रील पाहता पाहता आयुष्यच रीलमध्ये अडकते. जितकी गरज आहे तितकाच मोबाईल वापरा. विज्ञानाचा अज्ञानाने वापर झाला तर तोच अडथळा ठरतो. परिस्थितीवर मात करून आयुष्य घडवा. गरीबी ही परिस्थितीची नसून मनःस्थितीची असते. नशिबाला दोष देण्याऐवजी संघर्षातून स्वतःला घडवा.
“दुसऱ्याच्या यशाचे कौतुक करा. दुसऱ्याला चांगले म्हणणे हा स्वतःच्या प्रगतीचा एक टप्पा आहे. आत्मविश्वास अचानक मिळत नाही, तो सातत्यपूर्ण परिश्रमातून कमवावा लागतो. ज्याला स्वतःचा शोध लागतो, त्यालाच आयुष्याचा खरा सूर सापडतो,” असे सडेतोड विचार त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या कार्यक्रमात प्रा. प्रवीण दवणे यांचे स्वागत मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनायक राऊत यांनी केले. कार्यक्रमास सचिव विनायक राऊत, सल्लागार समिती सदस्य नंदकुमार डिंगणकर, डॉ. निमकर, सौ. दवणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले.

