(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या निनावी चॅलेंजर लीग २०२६ बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना क्रिकेटप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. प्रकाशझोतात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात एनडी चॅम्पियन आणि एनडी फोनिक्स या दोन बलाढ्य संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र अखेरीस एनडी चॅम्पियन संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामना जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यात एनडी चॅम्पियन संघाने नाणेफेक जिंकून एनडी फोनिक्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मर्यादित षटकांच्या या सामन्यात एनडी फोनिक्स संघाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र एनडी चॅम्पियनच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर त्यांना ६ षटकांत ५५ धावांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे एनडी चॅम्पियन संघासमोर विजयासाठी ५६ धावांचे आव्हान उभे राहिले.
५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एनडी चॅम्पियन संघाने आक्रमक सुरुवात केली. सलामीला उतरलेली वेदांत पुशाळकर आणि शुभम पुशाळकर या दोन भावांच्या जोडीने संयमी पण आक्रमक फलंदाजी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चौकार-षटकारांच्या जोरावर या जोडीने अवघ्या ३ षटकांतच लक्ष्य पूर्ण करत सामना एकतर्फी केला आणि संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजीसाठी वेदांत पुशाळकर यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर प्रभावी गोलंदाजीसाठी शुभम पुशाळकर यांना बेस्ट बॉलर पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रथम विजेता एनडी चॅम्पियन संघ व उपविजेता एनडी फोनिक्स संघ यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
विजयानंतर एनडी चॅम्पियन संघाचे मालक नंदेश (भाया) सुर्वे आणि नयनेश (नोन्या) सुर्वे, तसेच संघातील खेळाडूंनी मैदानात एकत्र येत जल्लोष साजरा केला. खेळाडूंच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण मैदान आनंदमय वातावरणाने भारावून गेले.
प्रकाशझोतात खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेला मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींची उपस्थिती लाभली होती. उत्कृष्ट आयोजन, दर्जेदार खेळ आणि नवोदित खेळाडूंना मिळालेल्या संधीमुळे निनावी चॅलेंजर लीग २०२६ ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली. अंतिम सामन्यातील एनडी चॅम्पियन संघाचा हा विजय संगमेश्वरच्या क्रिकेट इतिहासात नक्कीच लक्षात राहणारा ठरणार आहे.

