( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे या नामांकित कलामहाविद्यालयाशी ऋणानुबंध असलेले प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार सुरेश आवारी यांच्या दुःखद निधनाने कला क्षेत्रात मोठी हानी झाली आहे. सुरेश आवारी यांचे सह्याद्री कला कलामहाविद्यालयाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. तसेच कलामहाविद्यालयाचे चेअरमन, ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांच्याशी त्यांचे घनिष्ठ स्नेहसंबंध होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्रातील एक संवेदनशील, प्रयोगशील आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
सुरेश आवारी यांनी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे अनेक वेळा भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष कला प्रात्यक्षिके सादर केली होती. विशेषतः कलामहाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात त्यांनी दिलेले प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले होते. यावेळी त्यांनी उद्योजक प्रशांतजी निकम, तानाजीराव चोरगे, सुचयआण्णा रेडीज यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची व्यक्तीचित्रे प्रत्यक्ष साकार करून आपल्या कलेतील सहजता, निरीक्षणशक्ती आणि अभिव्यक्तीची उंची अधोरेखित केली होती. सुरेश आवारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कलामहाविद्यालयाचे चेअरमन ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, प्राचार्य प्रा. माणिक यादव, प्राध्यापक वृंद व सर्व विद्यार्थी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कलामहाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी दोन मिनिटांचे मौन पाळून या ज्येष्ठ कलाकाराच्या स्मृतीस व त्यांच्या कलाविष्कारास मानवंदना दिली. कला क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील, असे यावेळी सांगण्यात आले

