(रत्नागिरी /प्रतिनिधी)
वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी आदर्श ठरणारे मरणोत्तर देहदानाचे कार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे सोमवारी (दि. ३ फेब्रुवारी २०२६) पार पडले. शहरातील रुपाजी सोसायटी, सुभाष रोड येथे राहणारे कै. सुहास प्रल्हाद सोहोनी (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. हे या महाविद्यालयातील १८ वे देहदान ठरले आहे.
कै. सुहास सोहोनी व त्यांच्या पत्नी शोभा सोहोनी यांनी जानेवारी २०२५ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास व संशोधनासाठी देहाचा उपयोग व्हावा, या सामाजिक उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे मरणोत्तर देहदान इच्छापत्र भरले होते. त्यांच्या स्वतःच्या व कुटुंबीयांच्या इच्छेनुसार सोमवारी सकाळी त्यांचे मरणोत्तर देहदान सन्मानपूर्वक पार पाडण्यात आले. कै. सुहास सोहोनी यांच्या पश्चात पत्नी शोभा सोहोनी, मुलगा राहुल सोहोनी तसेच नातवंडे असा परिवार आहे. देहदानाच्या वेळी त्यांचे पुत्र राहुल सुहास सोहोनी यांच्यासह नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होता. यामध्ये आनंद जोशी, राजू जोशी, प्रकाश सोहोनी, दत्तात्रय सोहोनी, प्रवीण लिमये, आयुष लिमये, दिनेश सोहोनी, सुभाष गानू, प्रदीप आगाशे, विनायक शितूत, समीर जोशी, स्वप्नील गानू, सुहास विद्वास यांचा समावेश होता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर यांच्यासह कर्मचारी मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयस जोशी व प्रियल आडिवरेकर यांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली. वैद्यकीय शिक्षणासाठी मोलाचे योगदान देणारे कै. सुहास सोहोनी यांचे देहदान समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, अशा उपक्रमांमुळे भावी डॉक्टरांच्या शिक्षणाला मोठी मदत होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

