(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरूख न्यू इंग्लिश स्कूलचे कुशल कलाशिक्षक दिगंबर मांडवकर यांनी आपल्या कुंचल्याच्या ताकदीने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची नोंद केली आहे. ‘इन आर्ट वर्ल्ड’ (In Art World) या नामांकित आंतरराष्ट्रीय मासिकाच्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत त्यांच्या कलाकृतीची निवड झाली असून, ही कलाकृती आता मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणार आहे.
मांडवकर यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर व तेथील घाट परिसराचे अत्यंत सूक्ष्म व भावस्पर्शी चित्रण कॅनव्हासवर साकारले आहे. हजारो चित्रांमधून फक्त चार कलाकारांची चित्रे अंतिम फेरीसाठी निवडण्यात आली असून, त्यात मांडवकर यांचा सन्मानास्पद समावेश आहे. या स्पर्धेत मांडवकर यांच्यासह अनुप सिन्हा, राजश्री नंदी आणि आर. पद्मजा या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकारांचीही चित्रे निवडण्यात आली आहेत.
या यशाबद्दल मांडवकर यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, शिक्षकवृंद तसेच तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यापूर्वीदेखील मांडवकर यांना देश-विदेशातील विविध प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून गौरवाचा वर्षाव होत आहे.