(अहमदाबाद)
अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट AI-171 (बोईंग 787 ड्रीमलाइनर) विमानाचा आज दुपारी भयावह अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्या सात मिनिटांत, हे विमान मेघानीनगर परिसरातील एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या अपघातात २३४ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर रमेश विश्वास कुमार हे एकमेव प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. अपघातग्रस्त विमानात महाराष्ट्रातील १२ प्रवासी व क्रू मेंबर्स होते, ज्यांपैकी बहुतेकजण अपघातात मरण पावले आहेत.
महाराष्ट्रातील प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांची यादी:
क्रू मेंबर्स:
-
सुमित सबरवाल – मुख्य पायलट, चांदिवली, मुंबई
-
सिविक कुंदर – को-पायलट, बोरिवली, मुंबई
-
अपर्णा महाडिक – सीनिअर केबिन क्रू मेंबर; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या नातेवाईक
-
मैथिली पाटील – केबिन क्रू मेंबर
-
दीपक पाठक – केबिन क्रू मेंबर, बदलापूर
-
रोशनी राजेंद्र सोनघरे – केबिन क्रू मेंबर, डोंबिवली
प्रवासी:
-
महादेव पवार – प्रवासी, मूळगाव सांगोला
-
आशा पवार – महादेव यांच्या पत्नी
-
मयूर पाटील – प्रवासी, महाराष्ट्र
-
यशा कामदार – प्रवासी, नागपूर
-
रक्षा मोदा – यशा यांच्या सासू
-
रुद्र मोदा – यशा कामदार यांचा दीड वर्षाचा मुलगा
लवकरच फोन करते….आईला सांगून गेलेल्या रायगड मधील मैथिलीचा मृत्यू

या अपघातात रायगड जिल्ह्यातील उरण न्हावा गावच्या मैथिली मोरेश्वर पाटील (वय २३) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून सेवेत असलेल्या या तरुणीच्या जाण्याने अवघा रायगड जिल्हा हळहळला आहे. मैथिली ही अवघ्या 22 वर्षांची होती. मोठी झाल्यावर हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं होतं. स्वप्न पूर्ण झालं मात्र विमान अपघातानं सगळंच संपवलं आहे. गुरुवारी सकाळीच आई-वडिलांचा निरोप घेत, “लवकरच फोन करते” असं सांगून मुंबईमार्गे अहमदाबादकडे रवाना झालेली मैथिली आता कधीच परत येणार नाही, याची कुणालाही कल्पना नव्हती. लंडनकडे जाणाऱ्या विमानात तिची ड्युटी होती आणि तेच तिचं अखेरच उड्डाणं ठरलं. दुर्घटनेनंतर काही क्षणांतच आगीच्या भक्ष्यस्थानी विमान गेलं. यात मैथिलीचाही आगीत होरपळून अंत झाला. अपघाताची बातमी मिळताच न्हाव्याच्या पाटील कुटुंबावर आभाळ कोसळलं. वडील, आई आणि मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले. निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली.
मंडणगड बुरी येथील रोशनी राजेंद्र सोनघरे यांचाही विमान अपघातात मृत्यू

अहमदाबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी विमान अपघातात केबिन क्रू सदस्य आणि इंस्टाग्रामवरील प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर मंडणगड बुरी येथील रोशनी राजेंद्र सोनघरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या सध्या डोंबिवली येथे वास्तव्याला होत्या. इंस्टाग्रामवर ५४,००० हून अधिक फॉलोअर्स असलेल्या रोशनी सोनघरे या एक प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर होत्या. त्या एअर इंडियामध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून कार्यरत होत्या आणि विविध प्रवास अनुभव शेअर करून अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले होते.
अपघाताची घटना
AI-171 फ्लाइटने दुपारी १:३१ वाजता अहमदाबाद येथून लंडनसाठी उड्डाण घेतले होते. परंतु १:३८ वाजता विमानाचा शेवटचा सिग्नल मिळाल्यानंतर काही क्षणांतच, ते मेघानीनगर परिसरात कोसळले. विमान धडकताच भीषण आग लागली, आणि संपूर्ण विमान जळून खाक झाले. परिसरातील इमारती व वाहनांनाही मोठे नुकसान झाले आहे.
दुर्घटनेचे संभाव्य कारण:
प्राथमिक तपासणीत दोन शक्यता समोर आल्या आहेत:
-
इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड
-
पक्षी धडकल्यामुळे यांत्रिक बिघाड
तसेच काही अहवालांनुसार, विमानाचा मागील भाग उड्डाणावेळी इमारतीला धडकल्याचेही सांगितले जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
विमानातील एकूण प्रवाशी
-
169 भारतीय नागरिक
-
53 ब्रिटिश नागरिक
-
7 पोर्तुगीज
-
1 कॅनेडियन
-
2 नवजात शिशू आणि 11 लहान मुलांचा समावेश
अपघातानंतर तातडीने अग्निशमन दल, आपत्कालीन पथके आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतदेह ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी लक्ष केंद्रीत केले आहे.
विमानात सव्वा लाख लिटर इंधन; कुणालाच वाचवण्याची संधी मिळाली नाही
विमानात सव्वा लाख लिटर इंधन असल्याने स्फोटानंतर तापमान अती वाढल्याने कोणालाच वाचवण्याची संधी मिळाली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.
शहा म्हणाले की या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध आहे असे म्हटले. संपूर्ण देश एकसाथ आणि संवेदनांसह दुर्भाग्यपूर्ण दुर्घटनेत ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. अमित शाह म्हणाले की, भारत सरकार, गुजरात सरकार, भारताचे पंतप्रधान यांच्यावतीने ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. अमित शाह म्हणाले, अपघातानंतर १० मिनिटात भारत सरकारला माहिती मिळाली. तातडीने मी मुख्यमंत्री, गृहमंत्री, गृहविभागाचे नियंत्रण कक्ष, नागरी उड्डयण मंंत्री, नागरी उड्डयण विभाग सर्वांसोबत चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन लगेच आला होता, असे अमित शहा यांनी सांगितले. भारत सरकार, गुजरात सरकार आणि सर्व विभाग मदत कार्य आणि बचाव कार्य करत आहेत. या विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यापैकी एक प्रवाशी वाचल्याची माहिती समोर आली आहे. त्याला भेटून आलो आहे. मृत्यूंची संख्या डीएनए परिक्षण आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतर प्रशासन अधिकृतपणे जाहीर करेल, अशी माहिती देखील अमित शहा यांनी दिली.
कुणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही
घटनेनंतर तातडीने गुजरात सरकारने आपत्ती व्यवस्थापनांच्या सर्व विभागांना अलर्ट केले. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेड, पोलिस विभाग असो भारत सरकारच्या सीएपीएफला संपर्क करुन सर्वांनी एकत्र मिळून मदत कार्य आणि बचाव कार्य केले. सव्वा लाख लिटर इंधन विमानात होते. तापमान इतके वाढले की कुणालाही वाचवण्याची संधी मिळाली नाही. मी घटनास्थळावर जाऊन आलो आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.
डीएनएची कारवाई पूर्ण
सर्व प्रवाशांच्या मृतदेहाला बाहेर काढण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ज्या प्रवाशांचे नातेवाईक इथं पोहोचले आहेत त्यांचे डीएनए घेण्याचे काम दोन तीन तासांत पूर्ण होईल. विदेशात ज्यांचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती देण्याचे काम झाले आहे. ते जेव्हा पोहोचतील तेव्हा डीएनए घेतले जातील असे अमित शाह म्हणाले. जितके मृतदेह मिळाले आहेत, त्यांचे डीएनए नमुने घेण्याची कारवाई पूर्ण झाली आहे.
१००० डीएनए टेस्ट कराव्या लागणार
गुजरातमध्ये १००० डीएनए टेस्ट कराव्या लागतील. याची सुविधा गुजरातमध्ये आहे. त्यासाठी दुस-या राज्यात जावे लागणार नाही. एफएसएल आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठ दोन्ही संस्था कमी वेळात डीएनए परिक्षण पूर्ण करतील. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांना दिले जातील. नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था इतर व्यवस्था योग्यपणे करण्यात आली आहे. आढावा बैठकीत याबाबत माहिती घेण्यात आली आहे, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.
एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केला आहे:
📞 1800 569 1444
📞 +91 99741 11327 (अहमदाबाद विमानतळ)
या दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात असून, महाराष्ट्रात विशेषत: मोठा शोक व्यक्त केला जात आहे.