(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
डिजिटल युगात तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, 2030 पर्यंत भारताला सुमारे 20 लाख सोशल मीडिया व्यावसायिकांची गरज भासणार आहे. या वाढत्या मागणीचा विचार करून देशातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब्स सुरू करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम मानले जात होते. मात्र आता ते एक स्वतंत्र करिअर पर्याय म्हणून पुढे येत असून, सरकारने यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत देशातील 15 हजार माध्यमिक शाळांमध्ये विशेष कंटेंट क्रिएटर लॅब्स स्थापन केल्या जाणार आहेत. याशिवाय 500 आघाडीच्या महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत.
या सर्व लॅब्सचे नियोजन, संचालन आणि देखरेख इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत करण्यात येणार असून, या उपक्रमासाठी केंद्र सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळणार?
कंटेंट क्रिएशन म्हणजे केवळ व्हिडीओ बनवणे नसून, त्यामागे अनेक तांत्रिक आणि सर्जनशील कौशल्यांची आवश्यकता असते. या लॅब्समध्ये विद्यार्थ्यांना पुढील गोष्टींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे—
- व्हिडीओ एडिटिंग आणि पॉडकास्टिंग
आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने दर्जेदार व्हिडीओ व ऑडिओ निर्मिती - ग्राफिक डिझाईन आणि स्क्रिप्ट रायटिंग
प्रभावी मांडणी, लेखन आणि सादरीकरण कौशल्य - डेटा अॅनालिटिक्स
प्रेक्षकांची आवड, ट्रेंड्स आणि एंगेजमेंट समजून घेणे - डिजिटल मार्केटिंग आणि मुद्रीकरण
सोशल मीडियामधून उत्पन्न मिळवण्याचे तंत्र - नियम आणि नीतिमत्ता
कॉपीराईट कायदे, डिजिटल आचारसंहिता आणि जबाबदारीची जाणीव
भारताला ग्लोबल कंटेंट हब बनवण्याचा उद्देश
निर्मला सीतारामन यांच्या मते, भारत ही सध्या जगातील सर्वांत मोठ्या सोशल मीडिया बाजारपेठांपैकी एक आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना घरबसल्या रोजगाराच्या संधी, मोठ्या ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत सहभागी होता येणार आहे.
पदवी शिक्षणासोबत डिजिटल कौशल्य मिळाल्यास बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल, तसेच भारत जागतिक स्तरावर कंटेंट हब म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

