(रत्नागिरी / वार्ताहर)
शहरातील फेरीवाले आणि पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी निश्चित जागा उपलब्ध करून देतानाच वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील गर्दीचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर नियोजन सुरू झाले आहे. यासाठी रत्नागिरी शहरातील विविध भागांमध्ये संभाव्य पथविक्रेता विक्री क्षेत्रे (वेंडिंग झोन) निश्चित करण्यासाठी जागांची यादी तयार करण्यात आली आहे. या नियोजनातून विक्रेत्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासोबतच रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या संभाव्य आराखड्यात साळवी स्टॉप ते शिवाजीनगर दरम्यान असलेले सर्व स्टॉल, साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळील जागा, स्विमिंग पूलसमोरील तात्पुरत्या स्वरूपातील स्टॉल आणि फळविक्रेत्यांच्या सर्व गाड्यांसाठी जागा निश्चित करण्याचा समावेश आहे. मंगळवार बाजार ते नाचणे रोडवरील फेरीवाले, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या पूर्वेकडील महिला मंडळ ते मासे मार्केट रस्त्यालगत असलेले स्टॉल, तसेच स्टेडियम आणि मारुती मंदिर परिसरातील सर्व भाजी व फळविक्रेत्यांचाही या नियोजनात समावेश करण्यात आला आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील विक्रेत्यांसाठीही विविध जागा प्रस्तावित आहेत. शनिवार आठवडा बाजाराची जागा आणि जयस्तंभ ते शनिवार आठवडा बाजारापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले सर्व स्टॉल या आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच स्व. प्रमोद महाजन मैदानाच्या कंपाऊंडलगतची जागा, गाडीतळ येथील खादी ग्रामोद्योग शेजारील श्री. लिमये यांच्या मालकीची जागा, गाडीतळ पोस्टाजवळील स्टॉल आणि गाडीतळ लक्ष्मी चौक मैदान व परिसरातील स्टॉलधारकांसाठीही नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कला रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंपाऊंडशेजारील जागा आणि रुग्णालयाबाहेरील सर्व स्टॉल यांचाही संभाव्य वेंडिंग झोनमध्ये समावेश आहे. याशिवाय चर्मालयासमोरील जागेची योग्य व्यवस्था करून तेथे मार्किंग करण्याचे नियोजन आहे. धनजी नाका आणि मच्छी मार्केट परिसरातील विक्रेत्यांसाठी शाळा क्रमांक १४ चे मोकळे मैदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.
या संभाव्य नियोजनाची अंमलबजावणी झाल्यास शहरातील पथविक्रेते आणि फेरीवाल्यांना व्यवसायासाठी अधिकृत व निश्चित जागा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्याचबरोबर पदपथ आणि रस्त्यांवरील गर्दीचे नियोजन करणे शक्य होऊन वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. स्थानिक नागरिक आणि ग्राहकांनाही खरेदीसाठी अधिक सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.


