( नागपूर )
जरीपटका पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय आरोपीने कोठडीत चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, प्राथमिक चौकशीत हलगर्जीपणा समोर आल्याने पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नागेंद्रकुमार रामजी भारतीया (वय १९, रा. मदारीपुरा, प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे मृत आरोपीचे नाव आहे. तो कामगार असून रोजगाराच्या शोधात नागपूरला आला होता. याच दरम्यान मध्यप्रदेशातून आलेल्या एका कामगाराच्या कुटुंबाशी त्याची ओळख झाली. पुढे त्याचे त्या कुटुंबातील १६ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
या संबंधातून भेटीगाठी वाढल्या आणि आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी लग्नाच्या उद्देशाने त्याने मुलीला घरातून पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांत दिल्यानंतर तपासात दोघेही उत्तर प्रदेशातील मदारीपुरा गावात आढळून आले.
दोघांना नागपूरला आणल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर १९ जानेवारी रोजी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
कोठडीत असतानाच गुरुवारी पहाटेच्या सुमारास, परिसरात कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने चादरीने गळफास घेतल्याचे समोर आले. सकाळी सुमारे सहा वाजता ही बाब लक्षात येताच ठाण्यात गोंधळ उडाला. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
यानंतर सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त राजेंद्र दाभाडे, परिमंडळ सहाचे उपायुक्त संदीप पखाले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पोलिसांच्या निष्काळजीपणाचा संशय
पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते. मात्र, प्राथमिक तपासात रात्री कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आरोपीकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सुमारे वीस मिनिटांहून अधिक काळ आरोपी गळफास घेतलेल्या अवस्थेत असूनही कोणाच्या लक्षात न आल्याने गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप होत आहे.
प्रेमभंगामुळे तणावात असल्याचा कयास
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातून गुन्हा दाखल झाल्याने आणि अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सीआयडीकडून तपास सुरू
या घटनेची गंभीर दखल घेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) पथक जरीपटका पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तपासणी सुरू करण्यात आली आहे.
उपनिरीक्षकासह चार कर्मचारी निलंबित
या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक नितीन आत्राम तसेच हवालदार अमोल खडसे, राहुल चव्हाण आणि प्रमोद दुधकावळे यांना निलंबित करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळेत आरोपीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती.
पोलिस उपायुक्तांनी चौघांविरोधात निलंबनाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी स्वाक्षरी केल्यानंतर निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
विभागीय चौकशीचे आदेश
निलंबित करण्यात आलेल्या चारही पोलिस कर्मचाऱ्यांची सखोल विभागीय चौकशी समितीद्वारे करण्यात येणार असून, त्याबाबतचे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

