(सिंधुदुर्ग / प्रतिनिधी)
कोकणातील तरुणांचे रोजगारासाठी मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर थांबवून त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेल्या ‘रिव्हर्स मायग्रेशन’ संकल्पनेला आता प्रत्यक्ष आकार मिळू लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक आणि सागरी विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी तळवणे, ता. सावंतवाडी येथे होणार आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील सुशिक्षित आणि कुशल तरुणांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणातील तरुणांचे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’ची संकल्पना मांडली होती. स्थानिक पातळीवर उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास तरुणांना आपल्या गावाजवळच करिअर घडवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून या संकल्पनेला प्रत्यक्ष चालना मिळणार आहे.
झोया मरीम सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून तळवणे येथे हा जहाज बांधणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्यास सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिहर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि मान्यवरही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला मिळणार चालना
निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, शेती आणि मत्स्यव्यवसायासोबत मोठ्या औद्योगिक प्रकल्पांचीही गरज व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत जहाज बांधणी प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या सागरी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. जहाज बांधणीशी संबंधित विविध कामांमुळे कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होणार असून, स्थानिक युवकांना रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर थांबवण्यास मदत?
सिंधुदुर्गातील अनेक तरुण शिक्षण आणि रोजगारासाठी मुंबई, पुणे तसेच राज्यातील अन्य मोठ्या शहरांकडे स्थलांतर करतात. स्थानिक पातळीवर चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास हे स्थलांतर कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जहाज बांधणी प्रकल्प हा केवळ औद्योगिक प्रकल्प न राहता स्थानिक रोजगारनिर्मिती आणि ‘रिव्हर्स मायग्रेशन’ला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील हजारो सुशिक्षित आणि कुशल युवकांना आपल्या घराजवळच रोजगाराच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याकडे सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

