(संगमेश्वर / प्रतिनिधी)
प्रथम सत्राची परीक्षा संपताच दिवाळीच्या सुट्टीचे वेध लागलेल्या संगमेश्वर येथील पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी किल्ले उभारणी आणि रांगोळी स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. तयार वस्तूंच्या वाढत्या वापरामुळे मागे पडत चाललेल्या पारंपरिक कलांना उजाळा देतानाच विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पकतेतून काहीतरी नवे घडविण्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने शाळेने सलग दोन दिवस हा उपक्रम राबविला.
परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वातावरणातून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि नवनिर्मितीची आवड जोपासली जावी, यासाठी व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलने शाळेच्या परिसरात किल्ले तयार करणे आणि रांगोळी काढण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
किल्ले तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांचे छोटे हात दगड गोळा करणे, माती कालवणे आणि कागदकाम करण्यात गुंतले होते. मातीने माखलेले गाल आणि कपडे यांची पर्वा न करता विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीला अधिकाधिक आकर्षक बनविण्यावर लक्ष केंद्रित केले. पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत तब्बल दहा किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती साकारल्या. या माध्यमातून किल्ल्यांची रचना आणि त्यांचे स्वरूप समजून घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली. दुसरीकडे, प्रशालेतील विद्यार्थिनींनी एकत्रितपणे आकर्षक आणि नेत्रदीपक रांगोळ्या साकारत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
दिवाळीच्या सुट्टीपूर्वी सलग दोन दिवस राबविलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. शालेय अभ्यासाबरोबरच अशा सर्जनशील उपक्रमांमुळे मुलांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळत असल्याने पालकांनीही शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आणि पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक, वर्गशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या हातून नवनिर्मिती साकारण्याचा प्रयत्न
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्राधान्य देणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, विविध संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास प्रोत्साहन देणे आणि इतिहासाविषयीचे ज्ञान वाढविणे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दीपावलीच्या सुट्टीपूर्वी सलग दोन दिवस किल्ले तयार करणे आणि रांगोळ्या काढणे अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना प्रत्यक्ष साकारण्याची संधी देण्यात आली, अशी माहिती संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी दिली.
(छाया : मिनार झगडे, संगमेश्वर)


