(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जयगड परिसरातील जिंदाल कंपनीच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि स्थानिकांच्या सुरक्षिततेसह विविध न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाने आता गंभीर वळण घेतले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी सिकंदर खाडे आणि आशिष गडदे या दोन प्रमुख उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोघांनाही तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असतानाही मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने जयगड पंचक्रोशीतील संताप अधिक तीव्र होत आहे.
उपोषणस्थळी सिकंदर खाडे आणि आशिष गडदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याचे लक्षात येताच आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिका पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय पथकाने दोघांची प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारांसाठी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले. आंदोलनाच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी दोन उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्याने आंदोलनाचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. या घटनेची माहिती जयगड परिसरात पसरताच भूमिपुत्र, शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दाखल होऊ लागले. सुरुवातीला मोजक्या आंदोलकांच्या सहभागातून सुरू झालेल्या या लढ्याला आता व्यापक लोकसमर्थन मिळत आहे. संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. त्यामुळे आंदोलनाची धग आता केवळ उपोषणस्थळापुरती मर्यादित राहिलेली नाही.
जिंदाल कंपनीच्या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न, स्थानिक कामगारांच्या मागण्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांबाबत आंदोलकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. मात्र, या प्रश्नांवर ठोस तोडगा निघण्याऐवजी आंदोलनकर्त्यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. औद्योगिक विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांकडे आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यानंतर तरी प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेणार की केवळ परिस्थिती निवळण्याची प्रतीक्षा करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांना उपोषणापर्यंत पोहोचण्याची वेळ येणे ही प्रशासनासाठी निश्चितच आत्मपरीक्षणाची बाब आहे.
स्थानिक कामगार, मच्छीमार, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर लेखी व ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने आंदोलनाला भावनिक आणि आक्रमक धार मिळाली असून, आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण जयगड पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.


