(नवी दिल्ली)
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणाला आता गंभीर आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. ज्या खासगी विमान कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवारांना घेऊन प्रवास करत असलेले बॉम्बार्डियर लिअरजेट 45 चा टेल नंबर VT-SSK आणि सिरीयल नंबर 45-417 होता. ते 16 वर्षे जुने विमान होते. हे अपघातग्रस्त विमान दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे होते.
महत्त्वाची बाब म्हणजे, युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर तब्बल एक वर्षापूर्वीच बंदी घातली होती. असे असतानाही ही कंपनी भारतात उड्डाण सेवा कशी देत होती, आणि विशेषतः महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तिच्या विमानाला परवानगी कशी मिळाली, यावरून आता DGCA (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
‘लेव्हल 1’ सुरक्षा त्रुटी म्हणजे काय?
EASA च्या अहवालानुसार, व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला ‘लेव्हल 1’ या सर्वात गंभीर सुरक्षा श्रेणीत टाकण्यात आले होते. याचा अर्थ असा की, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कंपनीकडे विश्वासार्ह यंत्रणा नव्हती किंवा कंपनी तपास यंत्रणांशी सहकार्य करत नव्हती. या गंभीर त्रुटींमुळे कंपनीचा थर्ड कंट्री ऑपरेटर (TCO) परवाना निलंबित करण्यात आला होता आणि युरोपियन हवाई क्षेत्रात कंपनीच्या सर्व विमानांवर बंदी घालण्यात आली होती.
2023 मधील अपघाताची माहिती लपविल्याचा आरोप
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईत या कंपनीच्या लिअरजेट 45 विमानाला अपघात झाला होता. या घटनेबाबत EASA ने वारंवार तांत्रिक आणि अंतर्गत चौकशी अहवाल मागितला. मात्र, ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान EASA ने कंपनीला पाच वेळा नोटीस व स्मरणपत्रे पाठवली तरीही कंपनीने कोणताही अहवाल सादर केला नाही. असहकार्यामुळेच युरोपियन युनियनने संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करत उड्डाणांवर पूर्ण बंदी घातली होती.
DGCAला माहिती असूनही परवानगी दिली?
धक्कादायक बाब म्हणजे, युरोपियन युनियनने बंदीच्या आदेशाची अधिकृत प्रत भारताच्या DGCA कडे पाठवली होती. असे असतानाही भारतात, आणि विशेषतः अजित पवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रवासासाठी, या कंपनीच्या विमानाला परवानगी कशी मिळाली, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या संपूर्ण प्रकरणावर DGCA कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
तपास CIDकडे; ब्लॅक बॉक्स जप्त
गेल्या आठवड्यात कोसळलेले हे विमान याच वादग्रस्त कंपनीचे होते. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत कॅप्टन सुमित कपूर (15,000 तासांचा उड्डाण अनुभव), सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक (1,500 तासांचा अनुभव) अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, विमान परिचारिका पिंकी माळी यांचाही समावेश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवला आहे.
दरम्यान, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त केला असून, त्यातील डेटाच्या आधारे अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
CID चौकशी सुरू
CID पथकाने चौकशीला सुरुवात केली असून, पुणे ग्रामीण पोलिसांकडून संबंधित कागदपत्रे गोळा केली जाणार आहेत. पथक अपघातस्थळालाही भेट देणार आहे. मुंबईहून बारामतीकडे उड्डाण सुरू होण्यापूर्वी विमानात कोणतीही तोडफोड किंवा अदलाबदल झाली होती का, याचीही सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणामुळे खासगी विमान कंपन्यांच्या सुरक्षा निकषांवर, तसेच DGCAच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या चौकशीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

