(चिपळूण)
शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीस्वाराने सायकलवरून जाणाऱ्या मजूर व्यक्तीस जोरदार धडक दिल्याची घटना घडली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे मडगार्ड तुटून सुमारे १५ फूट लांब उडाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले.
अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार थांबण्याऐवजी धूम स्टाईलने वेगाने घटनास्थळावरून पसार झाला. रस्त्यावर उपस्थित नागरिक आणि व्यापाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो भरधाव वेगात निसटून गेला.
अपघातात जखमी झालेल्या मजूर इसमाच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव सुरू होता. व्यापारी अरुण भोजने तसेच अन्य व्यापाऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमीला सुरक्षित बाजूला हलवले. यानंतर पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्यात आला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून तो रुग्णालयात दाखल आहे.
दरम्यान, पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून आरोपी दुचाकीस्वाराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. फुटेजमध्ये संबंधित चालक स्पष्ट दिसत असल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांकडून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
चिपळूण शहरात, विशेषतः बाजारपेठ परिसरात, भरधाव व बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिक व व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अपघात झाल्यानंतर मदत न करता पळून जाण्याचे प्रकार गंभीर असून, अशा चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

