(रत्नागिरी – चिपळूण/ प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा जीवघेणा अपघात घडला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा पुरविण्यासाठी मुंबईहून निघालेली पोलिसांची व्हॅन शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे भीषण अपघातग्रस्त झाली. तब्बल १५ ते २० फूट खोल दरीत कोसळलेल्या या व्हॅनमध्ये एपीआयसह तिघे कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पालवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण सखाराम मडके (४३, नाकपाडा एम.टी, मुंबई), तन्मय खानविलकर आणि तुषार डांगरे यांचा समावेश असून सर्वांना तातडीने चिपळूणजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री सामंत यांच्या सुरक्षेसाठी ही टीम दुपारी मुंबईहून रत्नागिरीकडे निघाली होती. मात्र कळंबस्ते परिसरातील उखडलेला व खडखडीत रस्ता चालकासाठी संकट ठरला. रात्री वाहनावरील नियंत्रण सुटताच व्हॅन थेट दरीत कोसळली.
या अपघाताची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. दरम्यान, या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल पांडुरंग जवरत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

