(चिपळूण / रत्नागिरी)
जमिनीतील अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा राग मनात धरून शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करत बांबूचे कुंपण तोडून आंब्याची चार रोपे उखडल्याचा प्रकार तिवरे फणसवाडी येथे घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मोहन काशीराम कदम (वय ४३, रा. तिवरे, फणसवाडी, ता. चिपळूण; सध्या रा. ठाकुरवाडी, डोंबिवली, जि. ठाणे) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांच्या मालकीची तिवरे फणसवाडी येथील गट क्रमांक १५७० ही जमीन आहे. या जमिनीमध्ये आरोपींनी बांधलेले कथित अनधिकृत घर काढण्यासाठी फिर्यादीच्या वडिलांनी चिपळूण येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या न्यायालयीन दाव्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीच्या जमिनीत प्रवेश केल्याचा आरोप आहे. यावेळी जमिनीला असलेले बांबूचे कुंपण तोडण्यात आले तसेच फिर्यादीने लागवड केलेल्या आठ आंब्याच्या कलमांपैकी चार रोपे उखडून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, हा प्रकार सुरू असताना फिर्यादीची आई अनुसया काशीराम कदम यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचे म्हणणे न ऐकता शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी मधुकर गणपत कदम (६५), मनिषा गणपत कदम (६०) आणि गोविंद गणपत कदम (७०), तिघेही रा. तिवरे, फणसवाडी, ता. चिपळूण, यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३२९(३), ३२४(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जमिनीच्या मालकी व वापरावरून सुरू असलेला वाद न्यायालयाच्या चौकटीत असतानाच प्रत्यक्ष जमिनीवर तोडफोड व नुकसान झाल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाला आता कायदेशीर वादासोबतच गुन्हेगारी स्वरूपाची किनार लागली आहे.


