(चिपळूण)
चिपळूणमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना शिवसेना–भाजप महायुतीकडून प्रचाराला वेग देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी रोजी चिपळूण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेना चिपळूण शहरप्रमुख व नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी होणाऱ्या या सभेचे नियोजन माजी आमदार सदानंद चव्हाण आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
यापूर्वी नगर परिषद निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीकडून चिपळूणमध्ये मोठी सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ही जाहीर सभा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे मंगळवारी सकाळी १० वाजता होणार आहे. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचीही उपस्थिती असणार आहे. या सभेला शिवसेना व भाजपचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, तसेच महायुतीचे सर्व उमेदवार व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी दिली.

