(रत्नागिरी)
बुधवारी १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात व्यावसायिक, पशुपालक आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांना केंद्रस्थानी ठेवण्याचा सकारात्मक प्रयत्न दिसून येतो, अशी प्रतिक्रिया खारवी समाज पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी दिली आहे. विशेषतः सागरी किनारपट्टीवरील शेतकरी, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला देण्यात आलेल्या सवलती तसेच मत्स्य व्यवसायात महिलांचा सहभाग वाढवण्याचा निर्णय सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली ५०० एकात्मिक मत्स्य व्यवसाय केंद्रांची उभारणी केवळ उत्पादन वाढवणारी नसून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, प्रक्रिया उद्योगांचा विकास आणि निर्यात क्षमतेत वाढ करणारी ठरेल, असे मत पावरी यांनी व्यक्त केले. यामुळे किनारपट्टीवरील तरुणांना स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
नारळ उत्पादन वाढवण्यावर भर देणे आणि संशोधन केंद्रांची स्थापना करणे हे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी आवश्यक पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काजू आणि कोकोला जागतिक ब्रँड म्हणून विकसित करण्याची घोषणा स्वागतार्ह असली, तरी या योजनांचा प्रत्यक्ष लाभ स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग मिळाल्यासच या अर्थसंकल्पाचे खरे यश साध्य होईल, असा विश्वास खारवी समाज पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी यांनी व्यक्त केला.

