(रत्नागिरी)
विकसित भारताचा व्हिजन २०४७ साध्य करण्यासाठी स्पष्ट धोरण, दीर्घकालीन नियोजन आणि ठोस तरतुदी असलेले हे रचनात्मक बजेट असल्याची प्रतिक्रिया दीपक पटवर्धन यांनी दिली आहे. शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि तंत्रज्ञान या मानवसंसाधनाशी थेट जोडलेल्या क्षेत्रांवर विशेष भर देत वित्तमंत्र्यांनी संतुलित आणि भविष्याभिमुख अंदाजपत्रक मांडल्याचे त्यांनी सांगितले.
या बजेटमध्ये देशाच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी ७ नवे फास्ट रेल्वे कॉरिडोर, भारतात नवी विद्यापीठे स्थापन करण्याची योजना, मेडिकल टुरिझम हबचा विकास आणि पुढील पाच वर्षांत २० जलमार्ग विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोकणासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी नारळ व काजू फलोत्पादनाला प्राधान्य देणाऱ्या विशेष योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
एमएसएमई उद्योगांसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद, प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी एक वसतिगृह, तसेच आयटी आणि एआय क्षेत्रासाठी विशेष प्राधान्य देण्यात आल्यामुळे रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास पटवर्धन यांनी व्यक्त केला. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक वाढवून दीर्घकालीन सामाजिक विकास साधण्यावर बजेटचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवा क्षेत्राचे वाढते महत्त्व आणि जागतिक संधी लक्षात घेऊन भारताचा दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीने उपयुक्त तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच वेगाने विकसित होत असलेल्या शहरांसाठी प्रतिवर्षी १,००० कोटी रुपये खर्च करण्याची योजना या बजेटचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरते.
आयकर कायदे आणि प्रक्रियांमध्ये सुधारणा करणारे हे बजेट उद्योग, शेती, बँकिंग क्षेत्रासोबतच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाचे व्यापक स्वागत होईल, असा विश्वास दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.

