(रत्नागिरी)
सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या सोलापूरच्या दोन पर्यटकांवर भाट्ये समुद्रात जीवघेणा प्रसंग ओढवला. मात्र स्थानिक तरुणांच्या वेळेवर घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे दोघांचे प्राण वाचले. रविवारी दुपारी साधारणतः २.३० वाजता हा थरारक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजा तमन्ना मेत्रे (२२) आणि ऋषिकेश राजशेखर कोळी (२३), दोघेही रा. रविवार पेठ, शेळगी (जि. सोलापूर), हे रविवारी भाट्ये समुद्रकिनारी फिरण्यासाठी आले होते. दुपारी सुमारे १ वाजता ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले. जवळपास दीड तास पाण्यात राहिल्यानंतर त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दमछाक झाली आणि ते गटांगळ्या खाऊ लागले. परिस्थिती गंभीर होताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
त्यांचा आकांत किनाऱ्यावर ऐकू येताच भाट्ये गावातील तरुणांनी क्षणाचा विलंब न लावता मदतीसाठी धाव घेतली. किरण अशोक भाटकर यांनी आपली ‘कृष्णा’ स्पीड बोट तातडीने समुद्रात उतरवली. त्यांच्यासोबत पराग चंद्रकांत भास्कर, संचित प्रवीण भाटकर, आदित्य मिलिंद भाटकर आणि महेश नथुराम पिलणकर यांनी बोटीतून खोल पाण्यात जाऊन या दोन्ही पर्यटकांना सुरक्षितपणे बोटीत खेचून घेतले.
श्वास रोखून धरणाऱ्या या बचावकार्यातील चपळाई, धाडस आणि समयसुचकतेमुळे तेजा आणि ऋषिकेश यांचे प्राण वाचले. दोघेही सध्या पूर्णपणे सुरक्षित असून त्यांनी बचावकार्यात सहभागी सर्व तरुणांचे मनापासून आभार मानले आहेत.
रत्नागिरीतील समुद्रकिनारे वर्षभर पर्यटकांनी गर्दीने भरलेले असतात. मात्र भरती-ओहोटी, पाण्याचा अंदाज आणि सुरक्षेचे नियम न पाळल्याने अशा दुर्घटना घडतात. प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येते. आज भाट्ये ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

