(मुंबई)
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाने “अस्मिता, अभिमान आणि परंपरा जपण्यासाठी कटिबद्ध” या भूमिकेतून समाजकार्याचा वारसा पुढे नेत महाशिवरात्रीच्या दिवशी भागोजीशेठ कीर जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. महासंघ पुरस्कृत भागोजीशेठ स्मृती समितीच्या माध्यमातून हा कार्यक्रम शनिवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी माहिम येथील कोकण नगर येथे पार पडणार आहे.
या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. ३० जानेवारी २०२६ रोजी कोकण नगर, माहिम येथे एक तयारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत भागोजीशेठ कीर यांच्या जीवनकार्यावर सविस्तर संवाद साधण्यात आला. तसेच जयंतीनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
यावेळी लालबागच्या राजाचे सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. संतोष कांबळी यांच्या हस्ते भागोजीशेठ कीर यांच्या जीवनावर आधारित माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेवक श्री. वीरेंद्रजी तांडेल उपस्थित होते.
सभेस कोकण नगरच्या अध्यक्षा श्रीम. उषाताई उ. बांदिवडेकर, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर, महासंघाचे सरचिटणीस श्री. प्रकाशजी कांबळी, भागोजीशेठ स्मृती समितीचे अध्यक्ष श्री. किशोरजी केळसकर, कोकण नगरचे सभासद तसेच समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाशिवरात्रीच्या पावन दिवशी होणारा भागोजीशेठ कीर जयंती उत्सव समाजाच्या इतिहास, संस्कृती आणि सामाजिक योगदानाची नव्याने जाणीव करून देणारा ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

