(रायगड / लोणेर)
लोणेरे येथील लॉजमध्ये तरुणीच्या निर्घृण हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अनिस खान हा सराईत गुन्हेगार (हिस्ट्रीशीटर) असून, त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, त्याने स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीचीही हत्या केल्याचा गुन्हा त्याच्यावर असल्याची माहिती समोर आली असून आरोपीची ओळख पटवण्यामध्ये आता यश आले आहे.
पल्लवी मोरे (22) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून, माणगाव तालुक्यातील वडगाव बौद्धवाडी येथील राहणारी आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने प्रेम प्रकरणातून झालेल्या काही वादातून तरुणीची हत्या केल्याची माहिती आहे. आरोपी तरुण हा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील असून, त्याला नवी मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
२० एप्रिल रोजी लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सीमधील रूम क्रमांक १०१ मध्ये पल्लवी मोरे हिचा मृतदेह आढळून आला होता. हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्याला संशय आल्याने दरवाजा ठोठावण्यात आला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या गोरेगाव पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, पल्लवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. या घटनेनंतर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिस खान हा नवी मुंबईत राहत होता. घटनेपूर्वी त्याने पल्लवीसोबत बाहेरून जेवणाचे पार्सल आणले होते. हे पार्सल कोणत्या हॉटेलमधून आणले गेले याचाही शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या प्रकरणी माणगावच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात हत्या, बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. समाजानेही या घटनेचा निषेध करत, योग्य कारवाई न झाल्यास माणगाव बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मृत पल्लवीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी सकाळी घराबाहेर पडली होती, त्यानंतर तिच्याशी संपर्क झाला नव्हता. रात्री उशिरा पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतरच ही धक्कादायक घटना उघडकीस आली. “ज्याने हे कृत्य केले त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे,” अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

