(संगमेश्वर / एजाज पटेल)
कसबा जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता थेट सत्तासंघर्षाचे केंद्र बनली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या रचना महाडिक यांचा हा पारंपरिक ‘होम पीच’ मानला जात असला, तरी बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही लढत अधिक चुरशीची आणि निर्णायक ठरत आहे. त्यामुळे कसबा गटात नेमकी बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना एकसंघ असताना रचना महाडिक यांनी याच कसबा गटातून सलग तीन वेळा विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. स्थानिक विकासकामे, मतदारांशी असलेला थेट संपर्क आणि मजबूत संघटन यामुळे कसबा गट शिवसेनेचा ‘अभेद्य गड’ म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि वारसा हीच त्यांच्या ताकदीची प्रमुख सूत्रे मानली जातात.
मात्र, शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर कसबा गटातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. एकाच पक्षातून उभ्या राहिलेल्या शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटामध्ये आता थेट शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर उबाठा सेनेकडून कडवई येथील विशाखा कुवळेकर यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उडी घेत रचना महाडिक यांना थेट आव्हान दिले आहे.
पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्या तरी विशाखा कुवळेकर यांची आक्रमक प्रचारशैली, स्थानिक प्रश्नांवरची स्पष्ट भूमिका आणि ठाकरे सेनेचे संघटन यामुळे ही लढत दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. ‘अभेद्य गड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा गटात बदल घडवण्याचा निर्धार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला असून, त्यामुळे निवडणूक वातावरण अधिक तापले आहे.
अनुभव, राजकीय पकड आणि होम पीचचा फायदा असलेल्या रचना महाडिक विरुद्ध बदलाची हाक देणाऱ्या विशाखा कुवळेकर अशी ही लढत आता केवळ एका गटापुरती न राहता संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय दिशा ठरवणारी मानली जात आहे. अखेर कसबा गटात शिंदे सेनेचा गड कायम राहणार की ठाकरे सेनेचा झेंडा फडकणार, याचा फैसला लवकरच होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

