(मुंबई)
गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी लालबागच्या राजाचा यंदाचा दरबार विशेष आकर्षण ठरत आहे. यंदा लालबागच्या राजाला तिरुपती बालाजीच्या सुवर्ण राज मुकुटात बसवण्यात आले असून त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या आधी लालबागच्या राजाचे पारंपरिक पहिले दर्शन व फोटो सेशन पार पडले. दरवर्षीप्रमाणेच या दरम्यान भक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारण गणेशोत्सवातील सुरुवातच लालबागच्या राजाच्या दर्शनाने होते. उत्सव काळात येथे २४ तास भक्तांची अफाट गर्दी असल्याने, गर्दी टाळण्यासाठी फोटो सेशन आगोदर घेण्यात येते.
सुवर्ण अलंकारांनी सजलेला दरबार
यंदा लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. सुवर्ण पावले, सुवर्ण मुकुट आणि सुवर्ण गजानन महल यामुळे दरबार अधिकच दिमाखदार भासत आहे. लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची तब्बल ५० फूट इतकी ठेवण्यात आली आहे, जी आतापर्यंतची विक्रमी उंची मानली जाते. लालबाच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पावले ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट लालबागच्या राजाचा पहायला मिळत आहे.
लेझर लाईट्सची शोभा
फोटो सेशन दरम्यान वापरण्यात आलेल्या लेझर लाईट्समुळे लालबागच्या राजाचे पहिले दर्शन आणखीनच विलोभनीय झाले आहे. भक्तांना यंदा लालबागच्या राजाच्या दरबारात पारंपरिकतेसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम अनुभवायला मिळणार आहे. लालबागच्या राजाचे हे फोटो सेशनसाठी होणारे पहिले दर्शन लेझर लाईट्समुळे आणखीनच विलोभनीय झाले आहे.

संपूर्ण जगभरातून गणेशभक्त लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मुंबईत दाखल होतात. यंदाही लालबागचा राजा 27 ऑगस्ट 2025 रोजी विराजमान होणार आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 पर्यंत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. रविवारी 24 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी ७ वाजता लालबागच्या राजाचं मुखदर्शन सुरु झालं आहे.
नवसाला पावणारा गणपती लालबागचा राजाचं मुखदर्शन नुकतच सुरु झालं आहे. जगभरातून भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत पोहोचतात. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मंडळ परिसरात भाविकांच्या मोठ्या रांगाच्या रांगाच लागलेल्या असतात. लालबागचा राजा परिसर आकर्षक रोषणाईने सजलेला असतो. यंदाही लालबागच्या राजाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.


