(रायगड)
पेण तालुक्यातील हेटवणे वाडी येथे घडलेली एक हृदयद्रावक आणि रहस्यमय घटना संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे. केवळ चार वर्षांची किशोरी किरण महालकर बुधवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी आईसोबत गावाबाहेर शौचास गेली होती. आईने “बाळा, आलोच मी…” एवढं सांगून काही क्षण बाजूला गेल्यानंतर परतल्यावर मुलगी अचानक बेपत्ता असल्याचे दिसून आले.
आईच्या किंकाळ्यांनंतर गावकरी तातडीने जमा झाले आणि शोधमोहीम सुरू झाली. घनदाट जंगलाला लागून असलेल्या परिसरात सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरूच ठेवण्यात आले. दरम्यान, गावकऱ्यांना मुलीची चप्पल आणि काही कपडे नाल्याजवळ सापडले; मात्र मुलगी मात्र कुठेच दिसली नाही. यामुळे गावात प्रचंड भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकस्मात अपघात की काही घातपात? हा प्रश्न आता सर्वांच्या मनात आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी शोधमोहीम वाढवण्याचे आदेश दिले आहेत. पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी, क्यूआरटी, श्वानपथक आणि खोपोली बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू आहे. मात्र, दोन उलटूनही चिमुकलीचा कोणताही ठोस थांगपत्ता लागलेला नसल्याने गावात प्रचंड तणाव आणि संभ्रमाचे वातावरण आहे.

