(शिर्डी)
देशातील प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ई-मेलद्वारे मिळालेल्या या धमकीनंतर साईबाबा संस्थानने तातडीने शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धमकीत मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई परिसरात स्फोटके ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. धमकी मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, मंदिर परिसरात गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्ब शोध पथक, श्वान पथक आणि स्थानिक पोलीस दल तपासणी मोहीम राबवत आहेत.
‘भगवंत मान’ नावाने आलेला ई-मेल
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धमकीचा ई-मेल ‘भगवंत मान’ नावाने पाठवण्यात आला आहे. ई-मेल आयडीच्या तपासातून हे नाव समोर आले असून, त्या आधारे सायबर गुन्हे शाखा तपासाला गती देत आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार नायट्रिक बॉम्ब असल्याचा दावा
ई-मेलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, साई मंदिरातील समाधी स्थळ आणि द्वारकामाई येथे चार नायट्रिक बॉम्ब ठेवले गेले असून, ते दुपारी १ वाजता निष्क्रिय होतील. त्यामुळे भाविक आणि मंदिर कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर काढण्याची धमकी दिली गेली आहे. यामुळे मंदिर ट्रस्ट आणि प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
भाविकांसाठी सुरक्षा अधिक कडक
साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. देशातील विविध राज्यांबरोबरच परदेशातूनही श्रद्धाळू शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे नेहमीच सुरक्षेचा उच्चस्तरीय बंदोबस्त असतो. प्रवेशद्वारांवर पुरुष व महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांद्वारे कसून तपासणी केल्यानंतरच भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. मात्र, अशा धमकीनंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. मंदिर परिसर, प्रवेशद्वारे, दर्शन रांगा आणि महत्त्वाचे मार्ग याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरु
सध्या संपूर्ण परिसरात बॉम्ब शोध पथक आणि डॉग स्क्वॉडद्वारे तपासणी सुरु आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा आयपी अॅड्रेस, लोकेशन आणि खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी सायबर फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता, विश्वास ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.