(नाशिक)
स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणारा आणि सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात याला महिलांवरील अत्याचार प्रकरणात नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.
महिलेला गुंगीचे औषध देऊन अत्याचाराचा आरोप
सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, खरातने ‘दैवी शक्ती’ आणि धार्मिक विधींच्या नावाखाली महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थ देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २०२२ ते डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू होता, असे तक्रारीत नमूद आहे.
छाप्यात सापडले धक्कादायक पुरावे
कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे आणि आक्षेपार्ह चित्रफिती सापडल्या. या व्हिडीओंमध्ये काही नामांकित महिला, अधिकारी आणि राजकीय व्यक्तींचा उल्लेख असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आणखी तक्रारींची शक्यता
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या एकाच महिलेने तक्रार दिली असली तरी आणखी महिलांनी पुढे येण्याची शक्यता आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे.
राजकीय नेत्यांशी संबंध चर्चेत
अशोक खरात हा अंकशास्त्र आणि भविष्यकथनाच्या माध्यमातून अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात आला होता. त्याच्या ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी भेट दिल्याचे फोटो आणि माहिती समोर आल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.
रूपाली चाकणकर वादात
या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नावही चर्चेत आले आहे. खरात यांची पाद्यपूजा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अशोक खरात कोण आहे?
- मूळ गाव: कहांडळवाडी, सिन्नर तालुका
- व्यवसाय: मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी
- स्वतःची ‘कॅप्टन’ म्हणून ओळख
- अंकशास्त्र आणि ‘कॉस्मॉलॉजी’च्या आधारे भविष्यकथन
- श्री शिवनिका संस्थान अंतर्गत मंदिर उभारणी

