(बारामती)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यापासून अलिप्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामती येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, “या निर्णयाची मला कोणतीही माहिती नव्हती. सकाळी वर्तमानपत्रात वाचून कळले.” अजित पवार गटाच्या निर्णयापासून अंतर राखत त्यांनी सांगितले की, पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार संबंधित पक्ष नेतृत्वाचा आहे. “प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी जे ठरवले आहे, त्यावर आम्ही भाष्य करणार नाही. आमचा मार्ग वेगळा आहे,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या कार्यशैलीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार हे अत्यंत कर्तृत्ववान आणि सामान्यांशी थेट संवाद ठेवणारे नेते होते. लोकांच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती आणि न्याय देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असत. “त्यांची दिवसाची सुरुवात पहाटेच व्हायची. आज ते हयात असते तर घरात नव्हे, तर कामाच्या मैदानात असते,” अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी मोठा खुलासा केला. मागील चार महिन्यांपासून विलिनीकरणावर चर्चा सुरू होती, असे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. “विलिनीकरणाचा निर्णय अंतिम टप्प्यात आला होता आणि १२ फेब्रुवारी रोजी याबाबत अधिकृत निर्णय होणार होता,” असे शरद पवार म्हणाले.
दोन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात ही अजित पवारांची इच्छा होती, असे नमूद करत शरद पवार म्हणाले की, ही इच्छा पूर्ण व्हावी अशी आमचीही भूमिका आहे. या वक्तव्यातून त्यांनी विलिनीकरणाला स्पष्ट पाठिंबा दिला आहे. मात्र, अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेते विलिनीकरणासाठी फारसे उत्सुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार यांना घाईघाईत उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आल्याची राजकीय चर्चा सध्या रंगली आहे.
ही घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची मानली जात असून, येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

