(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये गावचे सामाजिक कार्यकर्ते सुनील गेल्ये यांची विश्व समता कलामंच, लोवले (संगमेश्वर) या सामाजिक संस्थेच्या वतीने “विश्व समता राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार” साठी निवड करण्यात आली आहे. बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या मानवतावादी व समतेच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन गेली वीस वर्षे अविरत समाजकार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान केला जातो.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शुभगंधा मंगल कार्यालय, मयुरबाग, लोवले, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मानाचा पट्टा असे आहे.
सुनील गेल्ये हे केवळ तेर्ये गावातच नव्हे, तर संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात एक संवेदनशील, धडाडीचे आणि लोकाभिमुख सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. कोणतीही सामाजिक, वैयक्तिक किंवा आर्थिक अडचण असो, मदतीसाठी आलेल्या हाकेला वेळेची तमा न बाळगता धावून जाणे ही त्यांची ओळख आहे. विशेषतः तळागाळातील, वंचित आणि दुर्लक्षित घटकांसाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य समाजासाठी आधार ठरले आहे.
गोरगरिबांना शासकीय योजना मिळवून देणे, आजारी रुग्णांसाठी आर्थिक व वैद्यकीय मदत उभी करणे, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ देणे तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रत्यक्ष मदतीसाठी पुढाकार घेणे अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. कोणताही गाजावाजा न करता, निःस्वार्थ भावनेने केलेल्या या कार्यामुळे समाजात त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
या पुरस्काराच्या घोषणेने तेर्ये गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात समाधान व्यक्त केले जात असून, विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ, युवक आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “संकटाच्या वेळी धावून येणारा आपला माणूस” अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करून समाजकार्याला प्रेरणा देण्याचे कार्य विश्व समता कलामंच सातत्याने करीत आहे. सुनील गेल्ये यांना मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार माणुसकी, समता आणि सेवाभाव अधिक बळकट करणारा ठरेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

