(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद-कवठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष कृतीतून शेतीचे धडे गिरवले. शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘कृषी अनुभूती उपक्रमा’अंतर्गत विद्यार्थ्यांनी शेतात चिखलात उतरून पारंपरिक पद्धतीने भाताची लावणी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भातशेतीची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
शहरीकरण आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आजची पिढी शेती व शेतकऱ्यांच्या कष्टांपासून काहीशी दूर जात आहे. विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे महत्त्व समजावे, शेतकऱ्यांचे कष्ट प्रत्यक्ष अनुभवता यावेत आणि शेतीविषयक प्राथमिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि नवनियुक्त केंद्रप्रमुख मिनाक्षी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वाटद-कवठेवाडी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतीविषयक उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण मिळावे, यासाठी शाळेच्या परिसरातील तसेच उपलब्ध असलेल्या शेतीचा उपयोग करून विविध पिकांची लागवड केली जाते.
यंदाच्या भात लावणी उपक्रमासाठी विनावापर असलेल्या शेतीचा उपयोग करण्यात आला. शाळेच्या व्यवस्थापन समितीने जमीनमालक महादेव धोपट यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांना भात लावणीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जमीन उपलब्ध करून दिली. त्यानंतर पालकांच्या सहकार्याने शेताची पूर्वतयारी करण्यात आली.
यावेळी प्रगतशील शेतकरी मारुती कुर्टे आणि उदय रहाटे यांनी विद्यार्थ्यांना भातशेतीची सविस्तर माहिती दिली. भाताचे रोप तयार करण्यापासून ते चिखलणी आणि प्रत्यक्ष लावणीपर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विकास योजना तसेच कृषी यांत्रिकीकरण उपअभियान याबाबतही माहिती दिली. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यांमध्ये पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शेतीतील विविध कामांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
माहिती आणि प्रात्यक्षिकानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने चिखलात उतरून भाताची रोपे लावली. गाणी म्हणत आणि उत्साहात भात लावणीचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. या उपक्रमातून तयार होणाऱ्या धान्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या पूरक व पोषक आहारासाठी करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता कुर्टे, उपाध्यक्ष सागर घवाळी, अक्षरा शिर्के, मुकुंद घवाळी, मुख्याध्यापक माधव अंकलगे, शिक्षिका पूनम कुलकर्णी तसेच सर्व पालकांनी सहकार्य केले.
पुस्तकी शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आस्था निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

