(रत्नागिरी / वार्ताहर)
मानवी मन, विचार, भावना आणि वर्तनाचा शास्त्रीय अभ्यास करणारे मानसशास्त्र हे महत्त्वाचे सामाजिक शास्त्र आहे. कौटुंबिक व सामाजिक नातेसंबंध, सुसंवाद, मानसिक-सामाजिक आरोग्य, ताणतणाव व त्यांचे व्यवस्थापन, निर्णयक्षमता आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध क्षेत्रांत मानसशास्त्राचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे भविष्यात सामाजिक शास्त्रांना अधिक महत्त्व प्राप्त होईल, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विवेक बेल्हेकर यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एम.ए. (मानसशास्त्र) अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सध्याच्या काळात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढत असून मानसोपचार व समुपदेशन क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीही वाढत आहे. त्यामुळे मानसशास्त्र विषयातील करिअरच्या संधींकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. या विषयातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग केवळ वैयक्तिक विकासासाठी न करता समाजाच्या हितासाठीही विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन डॉ. बेल्हेकर यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात एम.ए. मानसशास्त्र अभ्यासक्रम सुरू करणे हे एक धाडसी आणि काळाची गरज ओळखणारे पाऊल आहे. या माध्यमातून कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषयात दर्जेदार आणि संशोधनाधारित उच्च शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ नितीन लोणिष्टे, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सीमा कदम, कला शाखेच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. समाजाच्या विविध पैलूंचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी सामाजिक शास्त्रे अत्यंत महत्त्वाची असून, बदलत्या काळानुसार त्यांच्या उपयोजनाचे क्षेत्रही विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते एम.ए. मानसशास्त्र अभ्यासक्रमाचे तसेच मुंबई विद्यापीठाच्या ‘एमयू-प्रज्ञा’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
निवृत्त प्राध्यापक व समुपदेशक प्रा. माणिकराव बाबर यांनी मनोगत व्यक्त करताना मानसशास्त्राचा इतिहास आणि दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व स्पष्ट केले. भारतात मानसशास्त्र या विषयाकडे अद्याप अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, आध्यात्म आणि योगशास्त्रात मनाला मानसिक व भावनिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध मार्ग सांगितले असल्याचे नमूद केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने मानसिक आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. साहिल बोथरे यांनी केले. प्रा. ज्योती घडशी यांनी आभार मानले.

