(बारामती)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सुनेत्रा पवार आणि त्यांचे चिरंजीव जय पवार हे बारामतीतील ‘सहयोग सोसायटी’ येथील निवासस्थानावरून शुक्रवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उपमुख्यमंत्रिपदासाठी ‘होकार’
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर नेतृत्वाबाबत मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षात छगन भुजबळ, सुनील तटकरे यांसारखे अनुभवी नेते असूनही, पक्षाची एकजूट राखण्यासाठी आणि ‘पवार’ नावाचा वारसा पुढे नेण्यासाठी कार्यकर्ते आणि आमदार सुनेत्रा पवार यांच्याकडे बघत होते. सुरुवातीला सुनेत्रा पवार हे पद स्वीकारण्यास ईच्छुक नव्हता, मात्र पक्षातील परिस्थिती आणि आमदारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी अखेरीस उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास ‘होकार’ दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच वरिष्ठ नेत्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद आणि विधीमंडळ गटनेतेपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवण्यात येणार असून, त्यानंतर शपथविधीची अधिकृत घोषणा केली जाईल.
आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दुपारी २ वाजता मुंबईतील विधानभवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून अधिकृत निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राजभवनात राज्यपालांकडून त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तर अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू,” असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबतही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. यासंदर्भात पवार कुटुंबाची बारामतीत बैठक होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपद पवार कुटुंबातच राहावे, अशी भावना दोन्ही गटांतील अनेक नेत्यांकडून व्यक्त होत असून, त्यासाठी सुनेत्रा पवार या योग्य उमेदवार असल्याचे मत मांडले जात आहे.
पक्षप्रमुखपदही सुनेत्रा पवारांकडे?
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास होकार दिला आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्याचा मान मिळणार आहे. विशेष म्हणजे, अजित पवारांकडे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही सुनेत्रा पवार स्वतःकडेच ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या आता अजित पवारांप्रमाणेच पक्ष आणि सरकार अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणार असून, राज्याच्या राजकारणात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी पवार कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीकडे पक्षाची धुरा असावी, असे मत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचेही आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रमुखपदासाठीही सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पार्थ पवार राज्यसभेवर जाणार?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यास त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्या जागी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. पार्थ पवार यांनी यापूर्वी २०१४ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

