(मुंबई)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला तीन दिवस उलटत नाहीत, तोवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर गुरुवारी विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेनंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जागा रिक्त झाली असून, त्या पदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वप्रथम मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही मागणी मांडली होती. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडूनही याला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा साध्या पद्धतीने उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडू शकतो.
या संदर्भात बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, “सुनेत्रा पवार यांच्याकडे हे पद द्यावे, अशी अनेकांची मागणी आहे. अंतिम निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल. सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील वाटचाल कशी करायची, यावर आमचे लक्ष आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जागा तातडीने भरली जावी, ही भूमिका आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
शनिवारी दुपारी होणाऱ्या बैठकीनंतर निवडीचे पत्र तातडीने मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी साधेपणाने पार पडण्याची शक्यता आहे. हा शपथविधी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या कार्यक्रमावर अवलंबून असेल. जर हा निर्णय अंतिम झाला, तर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे.

