(मुंबई)
मुंबईतील आझाद मैदानावर मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शिक्षकांनी सातत्याने सरकारकडे टप्पा अनुदान आणि पगारासंदर्भातील मागण्या लावून धरल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत, सर्व मागण्या मान्य केल्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना आता दिलासा मिळणार आहे.
महाजन यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला शिक्षकांचे प्रश्न समजून घेण्याची संवेदनशीलता आहे. तुमचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.” त्यांनी स्पष्ट केलं की, आधी २०%, ४०%, नंतर ६०% टप्प्यांत अनुदान वितरित करण्यात आलं होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे उर्वरित टप्पा वितरित करण्यात विलंब झाला.
१८ जुलै रोजी पगार खात्यावर जमा होणार
महाजन यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, “शिक्षकांच्या संघटनेशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला आहे की, येत्या १८ जुलै रोजी अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या खात्यावर थकित पगार जमा केले जातील. त्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया २-३ दिवसांत पूर्ण करण्यात येईल.”
शिक्षकांच्या मुख्य मागण्या काय होत्या?
- ऑक्टोबर २०२४ मध्ये राज्य सरकारने टप्पा अनुदान लागू करण्याची घोषणा केली होती.
- परंतु प्रत्यक्ष निधी वितरित करण्यात आला नव्हता.
- दोन अधिवेशने संपून तिसरे सुरू असताना देखील पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली नव्हती.
- त्यामुळे शिक्षकांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरु केलं होतं.
सरकारच्या या निर्णयामुळे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. राज्यभरातील शिक्षकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे. पगाराच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक आता १८ जुलैची वाट पाहत आहेत.

