(राजापूर / वार्ताहर)
आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे डॉ. दिलीप माने, उपसंचालक आरोग्यसेवा, कोल्हापूर यांनी अचानक भेट दिली. या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ. माने यांनी सुरुवातीला स्वतःची ओळख न देता रुग्ण म्हणूनच केंद्रातील सेवा प्रत्यक्ष अनुभवण्याचा निर्णय घेतला.
या वेळी केंद्रात डॉ. मिसाळ, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या. डॉ. माने यांनी आपला ड्रायव्हर अभिजीत आजारी असल्याचे सांगून त्यांचा केसपेपर काढून तपासणी करण्यास सांगितले. त्यानुसार डॉ. मिसाळ यांनी अभिजीत यांची रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करून योग्य ती औषधोपचार सेवा दिली. तपासणीदरम्यान रुग्णाशी केलेला संवाद, तपासणीची पद्धत व उपचार प्रक्रिया ही सर्वसामान्य रुग्णांसाठी जशी केली जाते तशीच असल्याचे दिसून आले.
त्यानंतर डॉ. दिलीप माने यांनी स्वतःची ओळख उपसंचालक आरोग्यसेवा म्हणून करून दिली. हे समजताच उपस्थित कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटले. या अनुभवावर समाधान व्यक्त करताना डॉ. माने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथे रुग्णांना चांगली, तत्पर व गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात असल्याबद्दल मनापासून कौतुक केले.
यानंतर डॉ. माने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागांची सविस्तर पाहणी केली. औषध साठा, रुग्ण नोंदणी, तपासणी कक्ष, स्वच्छता, नोंदी तसेच एकूण व्यवस्थापनाबाबत त्यांनी माहिती घेतली व आवश्यक मार्गदर्शन केले. केंद्रातील कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी भविष्यातही अशीच सेवा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
या अचानक भेटीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथील वैद्यकीय व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून सामान्य रुग्णांसाठी दिली जाणारी सेवा योग्य दिशेने सुरू असल्याची खात्री या भेटीतून मिळाली आहे.

