(रायगड)
रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी–माणगाव घाटात एका आलिशान कारवर दरड कोसळून भीषण अपघात झाला असून, या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. स्नेहल गुजराती असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.हृदय पिळवटून टाकणारा हा दुर्दैवी प्रकार कोंडेथर गावाजवळ घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आलिशान कार पुण्यातून माणगावकडे जात होती. गाडीत एक गुजराती नामक कुटुंब प्रवास करत होते. ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावाजवळ ते पोहोचताच अचानक डोंगरातून मोठा दगड कोसळला. तो थेट गाडीच्या सनरूफवर आदळला. टोकदार दगड सनरूफ फोडून आत शिरला आणि गाडीत बसलेल्या महिलेच्या डोक्यावर थेट आदळला. त्या क्षणीच महिलेला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर महिलेला तात्काळ जवळच्या मोदी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ताम्हिणी घाट परिसरात दरवर्षी पावसाळ्यानंतर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. मात्र, या घटनेत एक निर्दोष जीव गमवावा लागल्याने स्थानिकांनी या मार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासनाने या भागात योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

