(लांजा/ प्रतिनिधी)
तालुक्यातील गवाणे येथील काजू प्रक्रिया उद्योगात तब्बल ३ लाख १२ हजार रुपयांचा ३९० किलो पक्का काजूगर चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी व्यवसायातील भागीदारासह दोघांविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कृषी प्रक्रिया उद्योगात घडलेल्या या प्रकारामुळे व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये लोकेश शेनॉय (रा. आनंदनगर, सनसिटी अपार्टमेंट, पुणे) आणि अर्जुन बोरकर (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही) यांचा समावेश आहे. याबाबत अनिकेत शिरीष पंडित (वय ३०, रा. साडवली, देवरुख, ता. संगमेश्वर) यांनी लांजा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी अनिकेत पंडित यांची रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित या संस्थेअंतर्गत गवाणे येथे काजू फॅक्टरी कार्यरत आहे. रविवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास, व्यवसायातील भागीदार लोकेश शेनॉय आणि त्याचा मित्र अर्जुन बोरकर यांनी फॅक्टरीतील १० प्लास्टिक पॅकेटमध्ये भरलेला एकूण ३९० किलो वजनाचा पक्का काजूगर परस्पर चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
चोरीला गेलेल्या काजूगराची किंमत ३ लाख १२ हजार रुपये इतकी असून, या घटनेमुळे उद्योगक्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी लांजा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ३०५ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

