(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील देवरे परिसरात पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीररीत्या ठेवलेले शस्त्र आणि जिवंत काडतुसे जप्त केली असून, या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
लांजा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्हा क्रमांक ८१/२०२६ नुसार, १५ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास देवरे येथील गोपाळकृष्ण मंदिराजवळील नदीकाठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांकडे छापा टाकण्यात आला असता, त्यांच्या ताब्यातून एक १२ बोर बंदूक व तीन जिवंत काडतुसे असा सुमारे १० हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अरुण नारायण चौगुले (वय ४६, रा. भडे, पिंपळवाडी, ता. लांजा) व शैलेश दिलीप मेस्त्री (वय ३३, रा. इसवली, सुतारवाडी, ता. लांजा) यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम १९५९ च्या कलम ३(१)/२५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस शिपाई सुयोग रोहिदास वाडकर यांनी तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल सारंगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सारंगले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राजेंद्र कांबळे, हवालदार विलास जाधव तसेच पोलीस शिपाई सुयोग वाडकर आणि नितेश राणे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वीपणे पार पडली.

