(रत्नागिरी / वार्ताहर)
सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नाझीमा रमजान गोलंदाज यांना भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था (भाकर) यांच्या वतीने सन २०२६–२७ चा ‘अरुणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून, विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नाझीमा गोलंदाज या सामाजिक कार्यकर्त्या असून, ग्रामीण भागातील गरजू घटकांना मदत करणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, अशा उपक्रमांत त्या सक्रिय आहेत. नवनिर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांमध्येही त्यांचे योगदान आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी अभिनंदन केले आहे.
या वेळी शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त दिलीप रेडकर, ॲड. समीर जाधव, संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, सचिव अश्विनी मोरे, उद्योजक संजय सूर्यवंशी, निलेश जाधव, रोशन कांबळे आणि अभिजित किंजले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


