(रत्नागिरी / वार्ताहर)
समुद्रसपाटीपासून सुमारे ११,५०० फूट उंचीवर, विरळ ऑक्सिजन आणि आव्हानात्मक चढ-उतारांचा सामना करत रत्नागिरीचे अल्ट्रा रनर अभिजित अशोक पड्याळ यांनी ४२.१९५ किमीची लडाख मॅरेथॉन ५ तास २२ मिनिटांत पूर्ण केली. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीवर मात करत केलेल्या या कामगिरीने त्यांच्या धावण्याच्या कारकिर्दीत आणखी एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे.
लडाख मॅरेथॉनचा मार्ग चोगलमसर, चुचोट आणि स्टकना या परिसरातून जातो. उंची, चढ-उतार आणि कमी ऑक्सिजन उपलब्धता यामुळे ही स्पर्धा धावपटूंसाठी मोठे आव्हान मानली जाते. अभिजित यांनी सुरुवातीचे २१ किमी वेगाने पूर्ण केले. त्यानंतर उंची वाढत गेल्याने त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. मात्र, अशा परिस्थितीतही वेग आणि मानसिक ताकद कायम ठेवत त्यांनी ५ तास २२ मिनिटांत मॅरेथॉन पूर्ण केली.
अभिजित यांचा सुरुवातीला खारदुंग ला चॅलेंज ७२ किमी या स्पर्धेत सहभागी होण्याचा मानस होता. मात्र, या स्पर्धेची नोंदणी पूर्ण झाल्याने त्यांनी फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. लडाखच्या उंचीशी शरीर जुळवून घेण्यासाठी त्यांनी स्पर्धेच्या आठ दिवस आधी लडाख गाठले.
“लडाख मॅरेथॉन ही फक्त धावण्याची स्पर्धा नाही; ती कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि त्यावर मात करण्याची परीक्षा आहे. प्रशिक्षणासोबत मानसिक ताकद आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले, तर यश नक्की मिळते,” असे अभिजित यांनी सांगितले.
अभिजित यांच्या धावण्याच्या कारकिर्दीत यापूर्वीही अनेक उल्लेखनीय कामगिरीची नोंद आहे. टाटा मुंबई मॅरेथॉन ४२ किमी ३ तास ५८ मिनिटांत पूर्ण करून त्यांनी सब-४ साध्य केले आहे. मानाच्या लोहापुरुष स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच सावंतवाडी ६ तास रनमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स मॅरेथॉनच्या अपहिल स्पर्धेत ८६ किमी अंतर ९ तास ५१ मिनिटे १२ सेकंदांत पूर्ण करून त्यांनी रॉबर्ट मत्शाली मेडल मिळवले आहे.
या धावण्याच्या प्रवासात त्यांना प्रशिक्षक दादासो सत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. लडाख मॅरेथॉनच्या उत्कृष्ट आयोजनाचे तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणाचे अभिजित यांनी कौतुक केले. या यशासाठी केसीएम, आरसीसी मित्रपरिवार, कुटुंबीय आणि सर्व समर्थकांचे त्यांनी आभार मानले. लडाखला रवाना होण्यापूर्वी घेतलेले श्री देव भैरी आणि सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांचे आशीर्वाद या प्रवासात प्रेरणादायी ठरल्याचेही अभिजित यांनी नमूद केले.
कॉम्रेड्स मॅरेथॉनपासून लडाखच्या उंच पर्वतरांगांपर्यंतचा अभिजित पड्याळ यांचा प्रवास जिद्द, मेहनत आणि सातत्याची नवी ओळख ठरला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कोकणातील तरुणांना रनिंग, फिटनेस आणि सातत्याची प्रेरणा मिळणार आहे.


